मालवणातील साळेलमध्ये तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील साळेल जाधववाडी येथील सत्यम नामदेव जाधव (वय 21) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. राहत्या घराच्या बाहेरील खोलीत लोखंडी शिगेला कापडी पट्टीच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

सत्यम सकाळी 10 वाजेपर्यंत कुटुंबीयांसोबत बोलत होता. त्यानंतर घराबाहेर फिरून तो त्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळाने वडील सत्यमच्या खोलीत गेले असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर सत्यमची आई घरात आली. समोरचे दृश्य बघून तिने हंबरडा फोडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सत्यम याच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी, चुलत भाऊ, बहिण असा परिवार आहे.

सत्यम याची मालवणमधील एका युवतीशी मैत्री होती. रविवारी दुपारी ती युवती साळेलला सत्यम याच्या घरी जेवायला आली होती. त्यानंतर सत्यमने तिला चौके येथे नेऊन सोडले होते. रात्री उशिरा युवतीचे नातेवाईक साळेल येथे येऊन सत्यमला धमकी देऊन गेल्याचे वडील नामदेव जाधव यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे. मालवण पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष शिवगण, राजन पाटील, विलास टेबुलकर, हर्षल खडपकर यांनी पंचनामा केला.