‘पीएमसी’ बँक गैरव्यवहार; संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी आज अखेर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल झाला. आरबीआयच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून सजबीरसिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरून पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचे संचालक वाधवा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

ऑडिटमधील त्रुटींचा शोध सुरू
आर्थिक अडचणीत आलेल्या पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेची आरबीआयच्या ऑडिटरकडून वेळोवेळी तपासणी केलेली आहे तरीही बँक अडचणीत आली. त्या पार्श्वभूमीवर ऑडिटमध्ये काही  त्रुटी राहिल्या आहेत का याचा शोध आता रिझर्व्ह बँक घेत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. बँकांच्या वाटचालीत नियंत्रक म्हणून आरबीआयची भूमिका महत्त्वाची असली तरी ऑडिटर, बँकेचे संचालक आणि अधिकारीही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्वांनीच जबाबदारीने काम करणे अवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून बँकेच्या ऑडिटमध्ये त्रुटी राहिल्या आहेत का याचा शोध रिझर्ह बँक घेत आहे. तो पूर्ण झाल्यानंतर बँक अडचणीत का आली याचे खरे कारण उघड होईल, असेही अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हायकोर्टात याचिका
रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आर्थिक अनियमिततेमुळे निर्बंध घातले आहेत. या कारवाईमुळे पीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे हाल होत असून याप्रकरणी ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. खातेदारांच्या हिताचा विचार करून पैसे काढण्याची मर्यादा हटविण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सामाजिक संस्था कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क (कॅन) च्या वतीने न्यायालयात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने नुकतेच पीएमसी बॅकेवर आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन निर्बंध घातले आहेत. यामुळे पीएमसी खातेदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. म्हणूनच लवकरात लवकर आरबीआयने हे निर्बंध हटवावे, त्याचबरोबर अशा बँकांबाबत रिजर्व्ह बॅकेने एक समिती नेमावी  अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.