
‘स्पेशल 26’ हा चित्रपट पाहून एका 22 वर्षीय तरुणाने एका म्हाडा अधिकार्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धेश पनवेलकर असे तरुणाचे नाव असून तो कल्याणचा रहिवासी आहे.
सिद्देशने पोलीस बनून एका म्हाडा अधिकार्या गाठले. आयकर विभागातून तुमच्याविरोधात तक्रार मिळाल्याचे त्याने बनाव केला. तसेच पुढील कुठलाच त्रास होऊ नये म्हणून सिद्धेशने अधिकार्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली. म्हाडा अधिकार्याला सिद्धेशबद्दल संशय आला. अधिकार्याने तातडीने पोलिसांत धाव घेतली. आयकर विभागाची अशी कुठलीच तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शेवटी म्हाडा अधिकार्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सापळा रचून सिद्धेशला रंगेहात पकडले. तेव्हा चौकशीदरम्यान सिद्धेशने आपला गुन्हा कबुल केला. स्पेशल 26 हा चित्रपट पाहून आपल्याला ही कल्पना सुचल्याचे त्याने सांगितले. सिद्धेशने अशा प्रकारे किती जणांना ‘चुना’ लावला आहे याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे. तसेच अशा प्रकारची कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांनी संपर्क साधावा असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.



























































