सीएसएमटीत ऍडव्हान्स ट्रेन इंडिकेटर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात एकाच वेळी 30 लोकलचे वेळापत्रक सांगणारे मोठय़ा स्क्रिनचे ऍडव्हान्स ट्रेन इंडिकेटर बसविण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना आपल्या लोकलची सुटण्याची वेळ पाहण्यासाठी मोबाईल ऍप पाहण्याची गरज राहणार नाही. तसेच लोकल कोणत्या फलाटावर लागणार आहे हे कळण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारचे एक ऍडव्हान्स ट्रेन इंडिकेटर्स सीएसएमटीत तिकीट घराजवळ लावण्यात आले असून दुसरे इंडिकेटर कल्याण दिशेकडील बाजूला लावण्यात येणार आहे. तसेच इतर महत्त्वाच्या स्थानकांतही अशा प्रकारची इंडिकेटर्स लावण्याची योजना आहे. या इंडिकेटरवर प्रवाशांना साधारण 45 मिनिटे ते एक तासाचे लोकल वेळापत्रक कळणार आहे.

प्रवाशांना रेल्वे स्थानकात येण्यापूर्वी लोकलची सुटण्याची वेळ आणि फलाट पाहण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर करावा लागत होता. मात्र आता सीएसएमटी स्थानकात आल्यानंतर 55 इंचांच्या टीव्ही स्क्रिनद्वारे लोकलचे वेळापत्रक दिसणार आहे. या इंडिकेटरवर संबंधित लोकल कोणत्या फलाटावर किती वाजता येणार आहे याची माहिती मिळणार आहे. आयपी ऍड्रेसवर आधारित असलेल्या या नव्या इंडिकेटर प्रणालीमुळे प्रवाशांना 30 लोकलचे वेळापत्रक एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे. या इंडिकेटरसाठी 5.75 लाख खर्च आला असून सीएसएमटी स्थानकात दोन इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांना सध्याची लोकल आणि त्यानंतर येणाऱया लोकलची माहिती मिळणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.