
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 9 याचिकांवर आता 14 नोव्हेंबरपासून सुनावणी होणार आहे. हे कलम रद्द का केले यावर बाजू मांडण्यासाठी केंद्र आणि जम्मू-कश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे चार आठवडय़ांची मुदत मागितली. ती मान्य करत न्यायालयाने हे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर कलम 370 वरील याचिकांची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, केंद्र आणि जम्मू-कश्मीर सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी फक्त दोन आठवडय़ांची मुदत द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी घटनापीठाकडे केली. मात्र, ही मागणी फेटाळत केंद्र आणि जम्मू-कश्मीर सरकारला न्यायालयाने चार आठवडय़ांची मुदत दिली.
आता नवीन याचिका स्वीकारणार नाही!
कश्मीरमधून 370 कलम हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे सुरूच आहे. त्यावर घटनापीठाने आक्षेप घेतला. न्यायालय म्हणाले, ‘370 कलमाविरोधात याचिकांचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत ज्या याचिका दाखल करून घेण्यात आल्या आहेत, आता फक्त त्यांचाच विचार केला जाईल. याचिकांचा ओघ असाच सुरू राहिला तर या प्रकरणाची सुनावणी सुरूच होणार नाही. त्यामुळे आता नवीन याचिका बंद’, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली.
व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रीय सुरक्षा याचा ताळमेल घाला!
370 कलमांवरील याचिकांवर केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, ‘कश्मीरमधील फोन सेवा सुरू आहे. दिवसा लोक मोकळेपणे फिरत असतात. मात्र, रात्री नाही. इंटरनेट आणि मोबाईल सेवा सुरू केली तर त्याचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जाईल.’ यावर न्यायालयाने ‘व्यक्तिस्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा यांच्यात ताळमेल घाला,’ असा सल्ला दिला.

























































