
ओदिशामध्ये जादूटोण्याच्या नावाखाली 6 जणांचे दात उपटण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना मानवी विष्ठाही खाऊ घालण्यात आल्याची अघोरी घटना समोर आली आहे. याप्रकरणी 29 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 22 महिलांचा समावेश आहे. या महिलांवर तीन जणांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचाही आरोप आहे. दरम्यान, या घटनेनंतर ओदीशामध्ये खळबळ उडाली आहे.
तसेच याप्रकरणी अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता असून पोलिसांनी पेट्रोलिंगही वाढवले आहे. ही घटना ओदीशातील ब्रम्हपुर मधील गंजम जिल्ह्यातील गोपापुर गावातील आहे. या गावातील काहीजण जादूटोणा करत असल्याचा गावकऱ्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी सहा जणांना घराबाहेर खेचत आणले व चिमट्याने त्यांचे दात उपटले. एवढ्यावर हे अघोरी कृत्य थांबले नाही. गावकऱ्यांनी नंतर या सहाजणांना बेदम मारहाण केली व जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घातली. विशेष म्हणजे ज्यांच्यावर जादूटोण्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या सर्व व्यक्ती साठ वर्षाहून अधिक वयोमानाच्या आहेत. या घटनेनंतर ओदिशामध्ये खळबळ उडाली असून सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 29 जणांमध्ये 22 महिला आरोपी आहेत. या महिलांवर तीन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा व अन्य सात महिलांचे आरोग्य बिघडवण्याचा आरोप आहे. या जादूटोण्याच्या वृत्तानंतर पोलिसांनी गंजम व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. अनेक आरोपी आजू बाजूच्या गावात लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.




























































