कचरा रोखण्यासाठी रेल्वे रुळांच्या शेजारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेशेजारील झोपडपट्टी, चाळींसदृश वस्त्यांमधून रुळांवरच कचरा टाकण्यात येत असल्याने रेल्वेच्या रुळांना धोका पोहचत असल्याने आता रुळांच्या शेजारी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. किंग्ज सर्कल आणि माहीमदरम्यान सीएसएमटी लोकलचा एक डबा बुधवारी सकाळी घसरल्याने त्यामागे प्रथमदर्शनी रुळांमध्ये टाकलेल्या कचरा जबाबदार असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

मुंबईच्या उपनगरीय लोकलच्या हार्बर मार्गावर सर्वाधिक झोपडपट्टी असून वडाळा, किंग्ज सर्कल, माहीम, वांद्रे या ठिकाणी झोपडपट्टीमधून कचरा थेट रुळांवर टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा कचऱ्यामुळे रुळांना धोका पोहचू शकतो. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेने रेल्वे रुळांजवळ सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या ठिकाणी असणार वॉच
माहीम, वांद्रे, जोगेश्वरी, दहिसर, मीरा रोड, नालासोपारा, स्थानकातील रुळांशेजारी झोपडपट्टय़ांची अतिक्रमणे आहेत. या झोपडय़ांमधून कचरा टाकण्याचे प्रमाण जास्त असल्यानेच या ठिकाणी कॅमेरे बसवले जातील. तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांद्वारे गस्तही वाढविण्यात येणार असल्यामुळे कचरा टाकणाऱयांना अटकाव होईल अशी यामागची योजना आहे.