
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या 4 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. या पार्श्वभूमीवर बहुतांशी उमेदवारांनी गुरुवारी आदल्यादिवशी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला. यामुळे राज्यभरात पदयात्रा, सायकल रॅली आणि ढोलताशांच्या गजरात निघणाऱया मिरवणुकांनी मुंबईसह राज्यभरातील वातावारण ढवळून निघाले. आपल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसला.
मुंबईत 49 अर्ज दाखल
मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत असलेल्या 10 विधानसभा मतदारसंघांपैकी आज एकूण 31 उमेदकारांचे 49 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शीव-कोळीवाडय़ातून भाजपचे कॅप्टन आर. तमिल सेल्वम, वंचितचे अमिरुद्दीन अलकमर निजामुद्दीन, वडाळ्यातून वंचितचे लक्ष्मण पवार, माहीममधून शिवसेना आमदार सदा सरवणकर, मनसेचे संदीप देशपांडे, काँग्रेसचे प्रदीप नाईक यांनी अर्ज दाखल केला. शिवडीतून शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी, भायखळ्यातून शिवसेनेचे यशवंत जाधव तर एमआयएमचे वारिस पठाण, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी अर्ज दाखल केले. मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी तर मुंबादेवीतून शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांनी अर्ज दाखल केला आहे तर कुलाब्यामधूनही दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
पुण्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी अर्ज दाखल केला. चांदिवलीमधून काँग्रेसच्या नसीम खान यांनी तर बेलापूरमध्ये भाजपच्या तिकिटावर मंदा म्हात्रे यांनी अर्ज दाखल केला. भाजपमधून मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारल्यानंतर पुण्याच्या कसबा पेठेतून मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये विलासराव देशमुखांचे पुत्र अमित आणि धीरज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परळीत भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे आमने सामने असून आज दोघांनीही अर्ज दाखल केले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे जीतेंद्र आक्हाड यांच्यासह बहुतांशी उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची नावे रात्री उशीरापर्यंत निश्चित झाली नव्हती. त्यामुळे काही मतदारसंघांत उमेदवार कोण हा प्रश्न अनुत्तरीत होता. शुक्रवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. हे उमेदवार उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर दक्षिण, पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
- विक्रोळीतून महायुतीचे उमेदवार सुनील राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार मनोज कोटक.
- जोगेश्वरीमधून महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मोठय़ा संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
- मुंबादेवीतून महायुतीचे उमेदवार विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर.
- शिवडीमधून महायुतीचे उमेदवार अजय चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना उपनेते, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि उपविभागप्रमुख गजानन चव्हाण उपस्थित होते.
- महायुतीचे कुर्ला विधानसभेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
- महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी विजयी संकल्प रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.
- कलिनामधून महायुतीचे उमेदवार विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार पूनम महाजन, बळीराम घाग, संजना मुणगेकर आदी उपस्थित होते.
- दिंडोशीतून महायुतीचे उमेदवार सुनील प्रभू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर उपस्थित होते.
- अणुशक्तीनगरमधून महायुतीचे उमेदवार तुकाराम काते यांनी उमेदवारी अर्ज भरला. सोबत खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते सुबोध आचार्य. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर.
























































