
शेताच्या शिवरस्त्याच्या वादातून निलंगा तालुक्यातील डांगेवाडी येथे झालेल्या मारहाणीत सुभाष दयानंद सुडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खून प्रकरणी तब्बल 17 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर खून प्रकरणी नामदेव सुभाष सुडे (रा. डांगेवाडी ता. निलंगा) याने तक्रार दाखल केली. कलांडी शिवारात त्यांची साडेचार एकर शेती आहे. सव्र्हे नंबर 17 ब मधील या शेतीच्या लगत सत्यवान ओनामे यांचे शेत असून दोघांमध्ये शिवरस्त्यावरुन मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. सदर वाद न्यायालयात दाखल झालेला होता. फिर्यादी त्याचे वडील सुभाष दयानंद सुडे, आजोबा दयानंद नामदेव सुडे, चुलत चुलता संजय दयानंद सुडे, चुलत आजोबा ज्ञानोबा नामदेव सुडे, चुलत चुलता बालाजी ज्ञानोबा सुडे हे शेतात असताना ज्ञानोबा अंगद ओनामे, जगन्नाथ विश्वंभर ओनामे, राजकुमार विश्वंभर ओनामे यांच्यासह 14 जण हातात काठ्या, कुऱ्हाडी, कत्ती, विळा घेऊन आले.
कोर्टात दाखल केलेला दावा काढून घ्यावा म्हणून मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात मारल्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडला. थोड्या वेळाने शुध्दीत आल्यावर त्याला वडीलांचा आवाज आला, पाणी, पाणी म्हणून ते विहळत होते. त्यांच्या डोक्याला, पायाला, कानाला मार लागलेला होता. उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात घेऊन आले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात खून प्रकरणी पोलीसांनी 17 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मारहाण प्रकरणी 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल
दरम्यान ज्ञानोबा अंगद ओनामे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सत्यवान नामदेव ओनामे यांना २ तारखेस राजू सुडे, दयानंद सुडे, जितेंद्र सुडे, यांनी मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर मेडीकलचा कागद दिला परंतु निटूर येथे डॉक्टर नसल्याने नर्सने मलमपट्टी करून पाठवले. 3 तारखेस साडे सात वाजण्याच्या सुमारास सुडे यांच्या शेतापाशी जगन्नाथ ओनामे, राजू ओनामे, दिनानाथ ओनामे, राम ओनामे, नामदेव ओनामे येत असताना संजय सुडे याने फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारले. राजू सुडे, संयज सुडे, ज्ञानोबा सुडे, बाळू सुडे, जितेंद्र सुडे, दयानंद सुडे, सुभाष सुडे, नामदेव सुडे, ज्ञानोबा सुडे, यांनी काठ्यांनी, कुऱ्हाडीने जगन्नाथ ओनामे, राजू ओनामे, पंडू ओनामे यांना मारहाण केली. या मारहाणीत जगन्नाथ ओनामे यांच्या दोन्ही हाताला मार लागला व हाड मोडले, पंडू ओनामे यांच्या डोक्याला मार लागला. या प्रकरणी 9 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





























































