
निवडणूक कामाच्या प्रशिक्षणाला हजर नसलेल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणाला दांडी मारून जिल्हा निवडणूक अधिकाऱयांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून 24 तासांत गैरहजेरीचे लेखी कारण देण्याचे आदेश शिक्षकांना देण्यात आले आहेत. अन्यथा या शिक्षकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणूक आणि प्रथम सत्र परीक्षा एकत्र आल्याने शाळांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. बहुसंख्य शाळांमधील सुमारे 80 टक्के शिक्षकवर्ग निवडणूक डय़ुटीवर असल्याने तोंडी परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन लांबणीवर पडले आहे. निवडणूक डय़ुटी आणि परीक्षा घेण्याची कसरत करणाऱ्या शाळांना सहशालेय उपक्रम राबविण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान, तंबाखूमुक्त शाळा तसेच याच महिन्यात वाचन प्रेरणा दिन साजरा होणार आहे. मात्र बहुसंख्य शाळांनी या उपक्रमाकडे काणाडोळा केला असून अभ्यासक्रम, उजळणी आणि परीक्षेवरच लक्ष केंद्रित केल्याचे शिक्षकांनी सांगितले.
मेडिकल सर्टिफिकेट नाकारले
काही वरिष्ठ शिक्षकांना रक्तदाब, हृदयविकार, दमा यांसारखे आजार असल्याने याविषयी मुख्याध्यापकांमार्फत निवडणूक अधिकाऱयांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न केला, पण ते नाकारण्यात आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
प्रामाणिकपणे निवडणूक डय़ुटी करणाऱया शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत शिक्षकांच्या या कामाची नोंद करा, अशी मागणी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी केली आहे. तसेच सेवापुस्तिकेतील या नोंदीची दखल शिक्षकांना राज्य, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करताना घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले.





























































