
हिंदुस्थानातील श्रीमंत क्रीडा संस्था म्हणून ओळखल्या जाणार्या बीसीसीआयच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या 23 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संलग्न संघटनांकडून आपल्या प्रतिनिधींची नावे पुढे करण्यात येत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून संजय नाईक यांचे नाव पुढे करण्यात आले असून कोलकाताकडून सौरभ गांगुली व हैदराबादकडून मोहम्मद अझरुद्दीन यांना प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहे. आतापर्यंत 38 प्रतिनिधींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. प्रतिनिधी पाठवण्यात आलेल्या व्यक्ती निवडणुकीत विविध पदांसाठी उभ्या राहू शकणार आहेत. त्यामुळे आता सौरभ गांगुली व मोहम्मद अझरुद्दीन हे निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यांचाही समावेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाल, आयपीएलचे माजी चेअरमन राजीव शुक्ला, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा आणि बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा यांचा मुलगा जयदेव शहा यांचीही प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
16 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार
बीसीसीआयकडून 16 ऑक्टोबरला प्रतिनिधींची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. याचसोबत निवडणुकीत विविध पदांसाठी कोणकोणत्या व्यक्ती उभ्या राहणार आहेत याचाही खुलासा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव व खजिनदार या पाच महत्त्वाच्या जागांसाठी मतदान होईल.




























































