राज्यातील कारागृहे सुपरडुपर हाऊसफुल्ल, कारागृह प्रशासनावर प्रचंड ताण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष बनसोडे

राज्यातील कारागृहांची आता खरंच दयनीय अवस्था झाली आहे. बाहेर जाणाऱयांच्या तुलनेत येणाऱया कैद्यांची संख्या दररोज वाढतच असल्याने कारागृहांच्या क्षमतेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जवळपास सर्वच कारागृहे सुपरडुपर हाऊसफुल्ल झाली असून त्याचा प्रचंड ताण कारागृह प्रशासनावर पडत आहे. याला वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती गंभीर होईल. तेव्हा यावर लवकरात लवकर उपाययोजना करा अशी आर्जव कारागृह अधीक्षकांनी वरिष्ठांकडे केली आहे.

राज्यभरात मध्यवर्ती, जिल्हा, खुली आणि महिलांसाठी अशी मिळून एकूण 60 कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांचा दम आता घोटू लागला आहे. कैदी दाखल होण्याचा पट कमी होण्याऐवजी झपाटय़ाने वाढतच असल्यामुळे ही कारागृहे आता अपुरी पडू लागली आहेत. कैद्यांना ठेवायचे कुठे, त्यांचा सांभाळ करायचा कसा, प्रत्येक कैद्यावर लक्ष ठेवायचे कसे अशा समस्यांनी कारागृहातील अधिकारी-कर्मचारी भांबावून गेले आहेत. उपलब्ध जागेची क्षमता कधीच संपली असून आता तर कैद्यांना जनावरांसारखे बरॅकमध्ये कोंबण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 30 जणांची क्षमता असणाऱया बरॅकमध्ये 200 जणांना ठेवावे लागत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

अधिकारी, कर्मचाऱयांचा प्रचंड तुटवडा
कैदी दाखल होण्याचे प्रमाण रोज वाढत असताना उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱयांचा फौजफाटा अपुरा पडू लागला आहे. एका कर्मचाऱयाला शेकडो कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत असून त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱयांच्या अक्षरशः नाकीनऊ येत असल्याचे सध्याचे चित्र आहे. कैद्यांची सुरक्षा करायची कशी, असा सवाल प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

नवीन कारागृहांशिवाय पर्याय नाही
सर्वच कारागृहांची क्षमता आता खरंच संपली आहे. कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन कारागृह उभारण्याशिवाय पर्याय नाही. झटपट सुनावण्या घेऊन खटले निकाली काढल्यास कैद्यांच्या संख्येवर फरक पडू शकतो असे काही अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

झोपायचे वांदे, त्वचारोग आणि नको ते वाद
बरॅकमध्ये जनावरे कोंबल्यासारखे कैदी ठेवावे लागत असल्याने बरॅकची जागा तोकडी पडू लागली आहे. त्यामुळे आहे त्या जागेत अक्षरशः तारेवरची कसरत करत कैद्यांना झोपावे लागत आहे. निवांत हातपाय पसरून झोपणे तर दूरच, एका कुशीवर झोपणेदेखील अवघड बनले आहे. त्यात एकमेकांना खेटून झोपावे लागत असल्यामुळे त्वचारोगाची समस्या निर्माण होते. शिवाय जागा मिळावी या कारणातून वादावादी होत असल्याचे तुरुंगातून बाहेर आलेल्या काही कैद्यांनी सांगितले.

कारागृहांची क्षमता संपलीय हे वास्तव आहे. याचा तुरुंग प्रशासनावर प्रचंड ताण पडतोय. त्यामुळे नवीन कारागृह उभारता येतील का किंवा अन्य काही पर्याय उपलब्ध होतात का याचा आम्ही विचार करीत आहोत.
– दीपक पांडे, उपमहानिरीक्षक (कारागृह)

मध्यवर्ती कारागृह व परिस्थिती     कारागृह क्षमता     सद्यस्थितीत संख्या   टक्क्यांनी जास्त
मुंबई मध्यवर्ती                          804                 3331                  414
ठाणे कारागृह                         1105                 3366                  305
संभाजीनगर                             579                 1743                  301
येरवडा                                 2449                5866                  240
नागपूर                                  1840                2230                  121
कोल्हापूर                               1789                2199                  123
तळोजा                                 2124                 2519                  119
अमरावती                                973                 1132                  116

राज्यातील कारागृहे
मध्यवर्ती कारागृह – 9
जिल्हा कारागृह – 30
खुली कारागृहे – 18
ओपन कॉलनी – 1
महिला कारागृहे – 2