वाकोल्यात प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला शिवडीत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाकोला येथील एका लॉजमध्ये प्रेयसीचा रस्सीने गळा आवळून हत्या केल्यानंतर मुंबई सोडण्याच्या तयारीत असलेल्या खुनी प्रियकराला शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अर्ध्या तासात गजाआड केले. चारित्राच्या संशयातून तरुणीची हत्या झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शनिवारी दुपारी वाकोला येथील कशीश लॉजमध्ये संध्या हरिजन (23) या तरुणीची रस्सीने गळा दाबून हत्या झाली होती. या प्रकरणी रात्री नऊच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच याबाबत सर्व पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. संध्या शिवडीची राहणारी असल्याचे स्पष्ट होताच बंदर परिमंडळाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नवनाथ चौधरी व पथकाने तत्काळ तपास सुरू केला.

संध्याची माहिती काढली असता तिचे विनोदकुमार हरिजन (28) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे चौधरी व त्यांच्या पथकाने विनोदचा शोध सुरू केल्यावर तो तामीळनाडूला जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यानेच संध्याची हत्या केल्याची कबुली दिली. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या अर्ध्या तासात शिवडी पोलिसांनी संध्याच्या मारेकऱयाला अटक केली. विनोद मूळ तामीळनाडूचा असून तो महिन्यातून एकदा संध्याला भेटायला शिवडीत यायचा. तो संध्यावर संशय घ्यायचा. त्यातूनच संध्याची हत्या झाली.