
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभरात महायुतीने आघाडी घेतली असतानाच आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधान राज्यभरात चार दिवसांत नऊ प्रचारसभा घेणार आहेत. जळगावमधून प्रचाराला सुरुवात करून अकोला, नवी मुंबई, पुणे, सातारा, परळी व त्यानंतर मुंबई येथे पंतप्रधानांची अखेरची प्रचारसभा होणार आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या प्रचारसभेविषयीची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचारसभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव तसेच साकोली येथे होणार आहे. जळगाव येथील मुक्ताईनगर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जागेवर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या निवडणूक लढवत आहेत. तेथूनच नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेला सुरुवात करणार असल्याने यामागे भाजपला नेमका काय संदेश द्यायचा आहे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. याच दिवशी भंडाऱयातील साकोली येथे मोदी यांची प्रचारसभा होणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी बुधवारी अकोला, जालन्यातील परतूर येथे तर नवी मुंबईत ऐरोली येथे प्रचारसभा घेण्यात येणार आहेत. गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी बीडमधील परळी येथे त्याचप्रमाणे पुणे तसेच सातारा येथे मोदी यांची सभा होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचा समारोप शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे.
मुकुल वासनिक आज विदर्भात तर राहुल गांधी उद्या मुंबईत
काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांची प्रचारसभा उद्या दुपारी 12 ऑक्टोबर रोजी नागभीड, गडचिरोली, चार्मोशी, बल्लारपूर, चंद्रपूर शहर, वरोरा येथे होणार आहेत, तर राहुल गांधी यांची सभा 13 ऑक्टोबर रोजी औसा, लातूर. मुंबईतील चांदविली आणि धारावी येथे होणार आहेत. काँग्रेसच्या स्टारप्रचारकांमध्ये सोनिया गांधी, डॉ.मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, प्रियंका गांधी-वाड्रा, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अशोक गेहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील, सचिन पायलट, शत्रुघ्न सिन्हा, नगमा मोरारजी, विजय वडेट्टीवार, मधुकर भावे, नाना पटोले यांचा स्टार प्रचारकांमध्ये सामावेश आहे.

























































