
>> शंतनू परांजपे
महाराष्ट्रातील प्राचीन वास्तुवैभवातील लेणी हा आकर्षणाचा आणि अभ्यासाचा भाग ठरली आहेत. अनेक लेण्यांबद्दलची माहिती प्रसिद्ध आहे परंतु काही लेणी अजूनही पुणाच्या खिजगणतीत नाहीत. पुण्यातील पाताळेश्वराची लेणी तशी अजून फारशी परिचित ठरली नाहीत. पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर पाताळेश्वराचा हा कातळकोरीव ठेवा वसला आहे.
पुणे शहराचा इतिहास बघायला गेलं तर इथे अनेक राजवटी नांदल्या. त्यापैकी इसवी सनाच्या आठव्या शतकात पुणे परिसरावर राष्ट्रकूट राजवटीचा अंमल होता. राष्ट्रपूट राजा कृष्णराज याच्या ताम्रपटात पुण्याचा उल्लेख हा ‘पुण्यक’ असा आला आहे. याच कृष्णराजाच्या कालावधीमध्ये भांबुर्डा गावठाणाजवळ (सध्याचे शिवाजीनगर. पूर्वी या भागाला भांबवडे म्हणले जायचे. त्याचे नामांतर इंग्रजांनी भांबुर्डे केले आणि पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी शिवाजीनगर असे नामकरण झाले.) हे लेणे खोडले गेले असावे असा कयास. हे मंदिर जमिनीपासून साधारणपणे 1 ते 2 मीटर खाली असल्याने कदाचित याला पाताळेश्वर असे नाव दिले असावे.
आपल्या ‘केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ या पुस्तकात जेम्स बर्जेस या लेणीची तुलना अंबेजोगाई येथे असलेल्या लेणीशी करतो. पुणे शहराच्या हेरिटेज कमिटीने ऐतिहासिक व सांस्पृतिक वारसा यादीत याचा समावेश जरी केला असला तर या मंदिराची सध्याची दुरवस्था बघता वेळीच जर लक्ष दिले नाही तर हा वारसासुद्धा काही वर्षांनी नष्ट होईल हे सांगायला काही वेगळ्या पंडिताची गरज नाही. या लेण्यांत जाण्यासाठी खडक पह्डून पायऱया तयार केल्या आहेत. त्या उतरून गेल्यावर आपणासमोर येतो तो प्रांगणातील नंदीमंडप. साधारण चार मीटर उंचीच्या आणि 12 जाडजूड खांबांवर गोलाकार छत असलेला हा मंडप बांधलेला आह. नंदी मोठय़ा आकाराचा असून त्याच्या मानेभोवती नाग कोरलेला दिसतो. तसेच गळ्यामध्ये घंटांची माळसुद्धा दिसते. या प्रांगणात डाव्या कोपऱयावर एक ओसरीवजा बांधकाम दिसत आणि त्याच्या पुढय़ात एक पाण्याचे टाके आहे. या गुहेची दोन खांब पुढे आणि मागे एक खोली अशी ही रचना आहे. या ओसरीच्या दाराशीच एक खोदलेले शिल्प दिसते अर्थात फार निरखून पाहिल्यावर काही अंदाज लावता येतात. प्रख्यात लेणी अभ्यासक जेम्स फर्ग्युसन याने या लेण्यांबद्दल काढलेल्या अभ्यासपूर्ण टिपणांमध्ये ही लेणी आठव्या शतकात (राष्ट्रकूट राजाच्या कालावधी मध्ये) झाली असावी असा निष्कर्ष नमूद केला आहे.
पाताळेश्वराचे मुख्य लेणं पाहण्यासारखे आहे. मुख्य लेण्याच्या पायऱया चढून जाताना उजव्या हाताला वरती एक अस्पष्ट होत चाललेला शिलालेख नजरेस पडतो. हा लेख देवनागरीमध्येच असला तरी तो पूर्ण वाचता येत नाही. पहिल्या ओळीतली ‘श्री गणेशायनमः’ ही अक्षरे तेवढी वाचता येतात. अनेक वर्षांच्या झिजीमुळे उरलेली अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. या पायऱया चढून गेल्यावर तीन गर्भगृहे कोरलेला गाभारा आहे. पैकी मधल्या गाभाऱ्यात भोलेनाथ विराजमान आहेत. अत्यंत देखणी असे शिवलिंग पाहून मन प्रसन्न होते. तिन्ही गाभाऱयाच्या प्रवेशद्वारापाशी गदाधारी द्वारपाल आहेत, मात्र त्यांचे तपशील मिळत नाहीत. उजवीकडे नंतर बसवलेली देवीची मूर्ती आहे आणि डावीकडील गाभाऱयात गणेशाची मूर्ती आहे. या तिन्ही गाभाऱ्यांना प्रदक्षिणा मारायला एक ओबडधोबड असा दगडी मार्ग आहे. मागे उजवीकडे अर्धवट खोदलेल्या ओवऱया आहेत. काही भिंतींवर पानाफुलांची नक्षी आहे.
मुख्य मंडपातील पहिल्या दालनात उत्तरेकडे दोन खांबांमधील भिंतीवर शिवाची आणि विष्णूची शेषशायी मूर्ती खोदलेली आहे. शेषाच्या वर काही मानवी आपृती कोरलेल्या दिसतात, मात्र ही सारीच शिल्पे खराब अवस्थेत आहेत किंवा ती अपूर्ण असावीत. काही अभ्यासकांच्या मते या तिन्ही गाभाऱयात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची स्थापना करून हे ठिकाण पूजनीय करण्याचा प्रयत्न केला असावा. त्यामुळे जरी आज शिव, पार्वती आणि गणेश विराजमान झाले असले तरी पूर्वी येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व नाकारता येत नाहीत.
पूर्वी हे ठिकाण गावाच्या बाहेर होते, परंतु नंतर गावाचा विस्तार मोठया प्रमाणात झाल्याने गावाच्या अगदी मध्यात याचे स्थान आले. आजमितीला याचा उपयोग केवळ फिरायला जायचे ठिकाण म्हणून केला जातो. थोडीफार मानसिकता बदलली आणि असलेल्या अवशेषांचे जतन केले तर पुणे शहराच्या पर्यटन विकासाला हे ठिकाण फार महत्त्वाचा हातभार लावू शकेल.






























































