
विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी रविवारपासून प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या पहिल्याच सभेत मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जळगावमध्ये उपस्थित जनसमूदायाला संबोधित करताना मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून निशाणा साधला. फोटो काढण्यासाठी घुसलेल्या कार्यकर्त्याला ‘एका नेत्याने’ कोपराने ढकलले. जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नाहीत, ते तुमच्या मुलांना काय मोठे करणार?’ अशा शब्दात मोदी यांनी पवारांचे नाव न घेता टीका केली.
मोदी पुढे म्हणाले की, ‘आमच्या व्यासपीठावर तरुण तडफदार नेते उपस्थित आहेत. यांच्याकडे एक नेते सोफ्यावर बसले आहेत. दोन चार जणांनी त्यांना उठवले. त्यांना माळ घालत असताना एक कार्यकर्ता फोटो काढायला घुसला. तर या मोठ्या, नाव आणि दबदबा असलेल्या नेत्याने त्याला कोपराने ढकलून दिले. जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नाहीत, ते तुमच्या मुलांना काय मोठे करणार?’ असा सवाल मोदींनी उपस्थित केला.
नक्की काय आहे प्रकरण?
सध्या सोशल मीडियावर शरद पवार यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका सभेतील हा व्हिडीओ असल्याचे दिसते. सभेत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना गुलाबांचा एक मोठा हार घातला. तो हार घालताना एक कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबत फोटोत दिसण्यासाठी त्या हारात डोके घालत होता. मात्र, पवारांनी त्याला तात्काळ आपल्या हाताच्या कोपराने बाजूला केले. यानंतर या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.























































