
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधापैकी आज पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू झाली.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कश्मीरमध्ये पर्यटकांना जाण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असलेल्या व्यापारी, हॉटेलमालक ते सर्वसामान्य या सगळय़ांनाच मोठा दिलासा मिळाला होता. पण इंटरनेट आणि मोबाईल सेवेमुळे पर्यटकांशी संपर्क साधणे, त्यांना माहिती देणे शक्य होत नव्हते. दरम्यान, 72 दिवसांनी फोन सुरू झाल्यामुळे काही जणांनी उत्साहाच्या भरात एका तासांत 30 फोन केले आहेत.
अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांची नजर
मोबाईल सेवा जरी सुरू केली असली तरी त्याचा गैरवापर दहशतवादी संघटना आणि त्याच्याशी संबंधित लोक करू शकतात, हे लक्षात घेऊन पोलिसांनीही दक्षता घेतली आहे. मोबाईलवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवले जात आहे.
- ‘बीएसएनएसल’च्या 40 लाख मोबाईलधारकांचे फोन सुरू झाले.
- 25 लाख प्रिपेडधारकांचे फोन, इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलेले नाहीत. व्हॉट्सऍप बंद ठेवण्यात आले आहे.
- 17 ऑगस्टला काही प्रमाणात फिक्स लाईन सुरू करण्यात आली.
- 4 सप्टेंबरला 50 हजार लँडलाईन सेवा सुरू करण्यात आली.
- 5 ऑगस्ट निर्बंध लागू केल्यानंतर काही दिवसांमध्ये कम्युनिकेशन सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, मोबाईल इंटरनेटचा दुरुपयोग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोबाईल फोन आणि त्यामधील इंटरनेट सेवा बंद केली होती.

























































