जनतेला दिलेली वचने पाळणारच – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना-भाजपच्या सत्तेच्या काळात सरकारने सामान्य जनतेच्या हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या महापुरामुळे होत्याचं नव्हंत झालं आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महापुरावर कायमचा तोडगा काढणार आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपये, एक रुपयात आरोग्य सेवा आणि मुलींना महाविद्यालयीन शिक्षक मोफत यासह जाहीरनाम्यातील सर्व वचने पाळणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. जयसिंगपूर येथे आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी ‘विजय निश्चय मेळावा’ आयोजीत केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, गोरगरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे म्हणून मोफत शिक्षण व मोफत पासची सोय करण्यात आली आहे. तसेच मुलांना परदेशातील शिक्षण देणार आहे. या महिन्यात राम मंदिराचा निकाल लागणार आहे. त्यानंतर राममंदिर पूर्ण होईल. मात्र, यानंतर राज्यातील बेरोजगारांच्या हाताला काम लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सरकारने भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेतला असला तरी ते जनतेला मान्य असल्याशिवाय मी करु देणार नाही. राज्यात खेळांना चालना देणार आहे. तसेच सैनिक टाकळी गावाला मी वंदन करुन गावात सैनिकी शाळा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना-भाजपचे राज्यात सर्वत्र उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, काही युवा कार्यकर्त्यांच्या विरोधात अनेक बांडगुळ निवडणूकीच्या रिंगणात आहेत. याप्रमाणे इस्लामपूर येथील असलेल्या बांडगुळाचाही तात्काळ बंदोबस्त करुन त्याला छाटून टाका, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात भगवे सरकार सत्तेत आल्यानंतर सत्ता ही हालती-झुलती न ठेवता विकासात्मक ठेवली आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापूर्वी स्वत:ची लायकी तपासावी, जर तुम्हाला आव्हानच द्यायचे असेल तर समोर या, पाठीमागून वार करण्याऱ्यांची आमची औलाद नाही. समोर आलात तर माझी जनता वाघनखांनी तुमचा बंदोबस्त करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, 1978 पासून साखर कारखाने, महाविद्यालये, जमिनी लाटल्या आहेत. आता म्हणत आहेत की माझे काय चुकले. आता काय चुकले म्हणून भावनिक साद घालून रडू नका, असे म्हणत मी केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूकीच्या रिंगणात उभा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, जि.प.सदस्या स्वाती सासणे, मंगल चव्हाण, विजय भोजे, मिथून पाटील, हिंदुराव शेळके आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,सतिश मलमे, वैभव उगळे,संजय माने, दिव्या बडवे, डॉ सविता पाटील,मिलिंद भिडे, मुकूंद गावडे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.