
‘शिर्डी आणि संगमनेर मतदार संघातील विकास कामाची तुलना करण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या निमिताने आली आहे. शिर्डीत आम्ही करून दाखविले तेच संगमनेरात घडू शकते, मात्र यासाठी परिवर्तन घडविण्याची हिम्मत दाखवावी लागेल. तुम्ही परिवर्तन घडवा विकासासाठी संगमनेर तालुका दतक घेतो’, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरातील घासबाजारात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत विखे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. वाळू तस्करी लॅन्ड माफीया आणि ठेकेदारी प्रवृतीने बरबटलेल्या या पक्षांना जनता कंटाळली असून जे लोकसभेत घडले तेच विधानसभेत घडणार असून संगमनेर विधानसभा मतदारसंघातही परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांवर झालेल्या इडीच्या कारईवर भाष्य करून विखे म्हणाले की, एक कारवाई झाली तर तुमच्या डोळ्यात पाणी आले, पण मुळा प्रवरा वीज संस्था बंद पाडून कामगारांना देशोधडीला लावले तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू का आले नाहीत. तीन महीन्यापुर्वी खासदार झालेले अमोल कोल्हे अचानक शेतीवर बोलायला लागले याचे आश्चर्य वाटल्याचा टोला लगावून अडीच वर्षात कोण जेलमध्ये दिसते हे तुम्हाला दिसेलच असा इशारा त्यांनी दिला.
























































