प्राण्यांसाठी मुंबईत तीन दहनभट्टय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगरपालिका प्राण्यांसाठी लवकरच मुंबईत तीन दहनभट्टय़ा सुरू करणार आहे. शहरात महालक्ष्मी येथे तर पश्चिम उपनगरात मालाड आणि पूर्व उपनगरात देवनार येथे या दहनभट्टय़ा होतील. यामुळे पाळीव किंवा भटक्या जनावरांच्या मृत्यूनंतर निर्माण होणारा त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार असून मुंबईकरांची रोगराई-दुर्गंधी आणि प्रदुषणातून सुटका होणार आहे.

मुंबईत सध्या भटक्या आणि पाळीव प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे. मात्र या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. काही वेळा मृत प्राणी पुरले जातात, तर काही उघडय़ावर टाकले जातात. त्यामुळे दुर्गंधी, रोगराईचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे  मृत प्राण्यांची विल्हेवाट दहनभट्टय़ांमध्ये लावणे अनिवार्य बनल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणाऱ्या प्राणी दहनभट्टय़ा महालक्ष्मी येथे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उभारली जाणार असून ती पालिकेकडून चालवली जाणार आहे. तर उपनगरात पालिका स्वतः या दहनभट्टय़ा उभारणार आहे. या दहनभट्टय़ांमध्ये पाळीव-भटके कुत्रे, मांजर, पक्षी, श्वान निर्बीजीकरणात मृत पावलेले श्वान, मांजर आणि देवनार पशुवधगृहातील मृत जनावरांची विल्हेवाट लावता येणार आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळेच घेतला निर्णय

मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या प्रभावी नियंत्रणाबाबतच्या खटल्यामध्ये उच्च न्यायालयाने याचिका 1596/1998 वर दिलेल्या आदेशानुसार मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये श्वान निर्बीजीकरण राबवणे आणि त्याच ठिकाणी दहनभट्टय़ा लावणे पालिकेला बंधनकारक आहे.

शिवाय प्राणी क्लेश कायदा 1960, प्राणी जनन नियंत्रण नियमावली (श्वान) 2001 नुसार प्राण्यांसाठी दहनभट्टी उभारणे स्थानिक प्रशासनाचे अनिवार्य कर्तव्य आहे. शिवाय मृत प्राण्यांच्या आरोग्याची विल्हेवाट आरोग्यदायी पद्धतीने लावणे गरजेचे आहे.

कोणताही धोका नाही

देवनार या ठिकाणी होणाऱ्या प्राणी दहनभट्टीमुळे प्रदूषण वाढून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्यामुळे या ठिकाणच्या दहनभट्टीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी ‘सपा’चे गटनेते रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा मांडून केली होती. मात्र देवनार भागात उभारण्यात येणारी दहनभट्टी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायू उत्सर्जन मानांकनानुसार उभारण्यात येणार असून या ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दहनभट्टीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसून मजबूत-सुरक्षित बांधकामामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.