बोगी नं. 786… एका जिद्दीचा प्रवास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

दिग्दर्शक संजीव कोलते. घरात विद्येची उपासना पण संजीवना वेगळीच वाट खुणावू लागली आणि सुरू झाला एका हट्टाचा प्रवास.

बोगी नं. सेव्हन एट सिक्स, व्हिक्टोरिया टर्मिनस (तेव्हाचं) आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा संजीव यशवंत कोलते यांचा तेव्हाचा पत्ता… आणि लोकल गार्डियन कोण तर एक शबाना नावाची वारांगना (कलावंतीण, कसबीण). शबाना यांनी संजीव कोलते यांना अगदी भावासारखं सांभाळलं आणि संजीव यांनीही त्यांना आपली बहीण मानलं. कोण कुठून आलेले दोन जीव एका जंक्शनला भेटतात आणि एका अनाहूत नात्यात गुंफून जातात. पण नातं एकदम जिवाभावाचं, पारदर्शक आरपार. संजीव कोलते यांना मोठा आधार मिळाला. दिवसभर कलाक्षेत्रात काही काम मिळतंय का ते बघायचं आणि संध्याकाळी आपल्या शबाना यांनी स्पॉन्सर केलेल्या बोगीमध्ये विसावायचं, हा सुरुवातीचा दिनक्रम… बावीस-तेवीस वर्षांचे संजीव कोलते तेव्हा मुंबईत काहीतरी कलाकार म्हणून काम मिळावं, पुढे नाव मिळावं म्हणून लांबून नागपूरहून मुंबईला आले होते.

नागपूर…
लहानपणापासून नकला करण्याची आवड. माणसाची पाठ फिरली की यांची नक्कल तयार. त्यातच आई नाटकात कामं करायची. तिथून प्रोत्साहन आणि वडील संख्याशास्त्राचे (स्टॅटिस्टिक) शिक्षक, अधिकारी, वाट कठीण होती. वडिलांचा विरोध, आईचं अल्प प्रोत्साहन असं नागपुरात सुरू होतं. नकलाकार मुलगा म्हणून ख्याती झाली आणि मदन गडकरी यांची नजर त्यांच्यावर पडली आणि संजीव नाटकाकडे ओढले गेले. रमलेही. अनेक बक्षिसांचा ढीग त्यांनी घरात लावला. आईला आवड होतीच, पण वडिलांचाही विरोध मावळला.

कोलते घराण्यातले जवळपास सगळे वाणिज्य शाखेतले उच्च पदवीधर. फक्त अपवाद संजीव यांचा. पण वडिलांनाही त्याचं वर्तमानपत्रात येणारं कौतुक आवडू लागलं आणि त्यांनी संजीव यांना मुंबईस जाण्याची परवानगी दिली. कुणी गॉडफादर नाही की कुणी आप्तस्वकीय नाही; पण संजीव मुंबईला पोहोचले आणि शबानाच्या निमित्तानं त्यांना आश्रय मिळाला.

बोगी नं. सेव्हन एट सिक्स…
पण तळमळ सुरू होती. ज्यासाठी मुंबई गाठली तसं काही घडत नव्हतं. मनातलं आक्रंदन काही शमत नव्हतं. कारण मोठय़ा हिमतीनं कुणीतरी कोलत्यांनी कलाक्षेत्रात मुशाफिरी करण्यासाठी पाऊल बाहेर टाकलं होतं आणि हाती काही लागत नव्हतं. हळूहळू कामं मिळू लागली. बाळ कोल्हटकरांच्या नाटकात संधी मिळाली. हुरूप वाढला. मग काही कामं. वर्षामागून वर्षे जात होती. पण उत्पादन काही हाती लागत नव्हतं. मुशाफिरी सुरू होती… या सगळय़ात प्रेम जमलं सुवर्णा विचारे या मैत्रिणीशी. लवकरच विवाहबंधनात अडकले. एक खंबीर साथ आली. एक आश्वासक खांदा आला… दोघांनी मिळून आकाश पेलायचं ठरवलं. झगडले… पराकोटीचे. पण वेळ साधत नव्हती… आणि ज्या स्टेशनवर नागपूरहून आल्यावर उतरले होते. सेव्हन एट सिक्समध्ये बसेरा होता. त्याच स्टेशनवरून संजीव यांच्यावर नागपुरास परतण्याची नामुष्की आली होती… केवळ दुःखद..

कलाक्षेत्राला भारावून एक तरुण मुंबईस आला खरा, पण आश्वासक काही न घडल्यामुळं त्याला स्वगृही परतावं लागलं. मोठा धक्का बसला. सजीव कोलतेंसहित सगळय़ा कुटुंबाला. ते सगळं पचवता येत नव्हतं… इलाजही नव्हता… नागपुरी मुक्काम वाढत गेला, शल्य ऊर कोरत राहिलं. घरातली शांतता भीती वाढवू लागली. नट होऊ पाहणाऱया आपल्या कलावंत मुलाची नामुष्की पिताजी यशवंत कोलते यांना पाहवली नाही आणि संख्याशास्त्र्ााच्या उपासकानं कोडं सोडवलं. एक दिवस पंचवीस-तीस पुस्तकांचा एक गठ्ठा पित्यानं पुत्रासमोर ठेवला आणि ते सक्तीनं वाचायला सांगितलं आणि एकच वाक्य बोलले ‘जर तुला King होता येत नसेल तर तू King maker हो…’ त्या पुस्तकाच्या सानिध्यानं आणि वडिलांच्या या एका वाक्यानं संजीव कोलते यांची विचार करण्याची दिशाच बदलून टाकली. संजीव कोलते यांना एक ऊर्जा मिळाली. त्यांना परत मुंबईला जावसं वाटू लागलं. त्यांनी निर्णय पत्नीला सांगितला. तिची खंबीर साथ नेहमीच होती… पुन्हा संजीव कोलते यांनी मुंबईस येऊन झपाटय़ानं कामाला सुरुवात केली. पण ते संजीव आणि आता परत आलेल्या संजीव यांच्या ऊर्जेत फरक होता. हा संजीव पूर्वीपेक्षा उमदा, ऊर्जागत, सकस आणि भान आलेला होता. आपल्याला आता काय करायचंय याचा सांख्यिकी आलेख डोक्यात असलेला Rational संजीव होता.

नवेंदू घोष. पटकथा लेखनामधलं उजवं नाव. त्याचा सहवास मिळाला. त्यांनी आधी अभिमान, मिली यासारख्या दर्जेदार सिनेमाच्या पटकथा लिहिल्या होत्या. त्यांच्या हाताखाली संजीव यांची जवळपास शाळाच सुरू झाली आणि एका नवीन संजीवाचा उदय झाला. ‘अपराजिता’ ही मालिका त्या दशकातल्या प्रत्येकाला माहीत आहे. संजीव कोलते दिग्दर्शित या मालिकेनं उदंड यश मिळवलं आणि संजीव कोलते ‘संजीव कोलते’ झाले. त्यांना धागा सापडला. तोच धरून त्यांची पुढे वाटचाल केली. अनेक मालिका, सिनेमे संजीवाला वाट सापडली, तो डोळा सापडला. ‘तानी’ संजीव कोलते यांचा अतिशय गाजलेला सिनेमा. केतकी माटेगावकरनं अप्रतिम काम केलं होतं. तेवढचं अरुण नलावडे यांनी. याची कथा लिहिली होती गायत्री कोलते यांनी. संजीव कोलते यांची मुलगी… काय पडावं एका बापाच्या ओंजळीत… किती भाग्यवान तो बाप. एका पुरस्कार समारंभात कथा विभागात मुलगी आणि पटकथा विभागात वडील अशी स्पर्धा असताना बाप म्हणत होता, मुलीला मिळावं आणि मुलगी म्हणत होती बापाला मिळावं. बाप जिंकला ती स्पर्धा हरून. पण त्या बापासारखा जेता त्या दिवशी कुणी नव्हता. ‘तानी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कथा म्हणून गायत्रीला गौरविलं गेलं. कोलते भरून पावले.

कोलते थांबत नाहीत, थकत नाहीत ते झपाटलेले आहेत. सतत नावीन्याचा ध्यास आहे. आज वयाची 39 वर्षे झाली व त्यांच्यात तीच ऊर्जा आहे. कोलते त्या अनेक नवीन रंगकर्मीसाठी ऊर्जा, मार्गदर्शक आहेत, ज्यांना वाट सापडत नाही. ज्यांना परंपरेच्या भिंती तोडून स्वतःला विरघळवून घ्यायचंय त्यांच्यासाठी दीपस्तंभ आहेत. संजीव कोलते यांचं नवीन पुस्तक येतंय. अतरंगी वल्ली… हे पुस्तकं आहे की त्यांचा धांडोळा… स्वतःचा स्वतःशीच.

[email protected]