पन्नास रुपये चोरीचा आरोप, बारावर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुकानातून पन्नास रुपये चोरी केल्याचा आरोप करत दुकानदार महिलेने शाळेत जाऊन मुलास अपमानित केले. अपमान सहन न झाल्याने सहावीत शिकणाऱ्या बारावर्षीय मुलाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री मोरया मंगल कार्यालयाजवळील रेल्वेपटरीवर घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दुकानदार महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

गारखेडा परिसर, आनंदनगरातील जनार्दन दत्तू क्षीरसागर (३८) यांचे सलूनचे दुकान आहे. त्यांना बारा वर्षाचा सूरज आणि नऊ वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी आहे. दोघे शिवाजीनगरातील कलावती चव्हाण हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. सूरज हा सहावीत शिकतो. दोघे भाऊ बहीण गुरुवारी सकाळी शाळेत जात असताना घराशेजारील सरला रत्नाकर धुमाळ हिच्या दुकानात गेले होते. गल्ल्यातून ५० रुपये सूरज याने चोरल्याचा संशय व्यक्त करत सरला धुमाळ हिने शाळेत जाऊन धिंगाणा घातला होता. त्यामुळे सूरज याने धाकाच्या भीतीने शाळेतून पळ काढला होता. सूरज शाळेतून गायब झाल्याने नातेवाइकांनी त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो आढळला नव्हता. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह मोरया मंगल कार्यालयाजवळील रेल्वेपटरीवर सापडला.

दरम्यान, आज सूरज याचे वडील जनार्धन क्षीरसागर यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सूरज याने सरला धुमाळ हिच्या छळास कंटाळून रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली. यावरून सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सरला धुमाळविरुध्द गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.