
राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशीनुसार नवी घटना करून निवडणूक प्रकिया पार पाडल्यानंतर आता उद्या बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळणार आहे. हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुली बुधवारी औपचारिकपणे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होईल. प्रशासकीय समितीचाही कार्यकाळही आता संपुष्टात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशासकीय समितीची निवड करण्यात आली होती. त्यांच्याच अधिपत्याखाली बीसीसीसीआयच्या नव्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. बीसीसीआयच्या बुधवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.
सौरभ गांगुली बिनविरोध अध्यक्ष झाला असला तरी पुढील वर्षी जुलैपर्यंतच त्याला या पदावर राहता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा हा सचिवपदी, तर उत्तराखंडचे माहीम वर्मा उपाध्यक्षपदी कार्यरत राहतील. अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण डी. यांची खजिनदारपदी, तर केरळचे जयेश जॉर्ज यांची सहसचिवपदी वर्णी लागणार आहे.



























































