मेकर कंपनी घोटाळा प्रकरण, संचालक सापडत नसतील तर मालमत्ता जप्त करा – हायकोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

पश्चिम महाराष्ट्रात जास्त पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांच्या 54 कोटींच्या ठेवी गडप करणाऱ्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱया पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. गुन्हेगार सापडत नसतील तर त्यांना फरार घोषित करून त्यांच्यावर कारवाई करा. एवढेच नव्हे तर त्यांची मालमत्ता जप्त करा, असे आदेश न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले.

सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील शेतकऱयांना शेती व बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीवर मिळणारे अधिक व्याजाचे आमिष दाखवून मेकर कंपनीने 54 कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी कंपनीचे प्रवर्तक रमेश वळसे-पाटील आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका संजय केरवा यांच्यासह 94 गुंतवणूकदारांनी ऍड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने या याचिकेची दखल घेत फसवणूक करणाऱयांविरोधात कोणतीही कारवाई अद्याप पोलिसांनी केलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली तसेच खडे बोल सुनावत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुन्हेगारांच्या मालमत्तेवर टाच आणा असे बजावले व सुनावणी 18 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.