
निव्वळ मित्रमंडळी आणि वाचकांच्या आग्रहाखातर सुरू झालेला ‘तुझ्या माझ्यातल्या गोष्टी’ हा संगीतमय कवितांचा कार्यक्रम रविवारी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सकाळी 10.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, मिनीथिएटर, बोरिवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रयोगाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक आणि कवी प्रबंध राऊळ सांगतात, रवींद्र नाटय़मंदिराच्या मिनी थिएटरला पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला आणि परिणामी आम्हाला 15 दिवसांत तिथेच दुसऱया प्रयोगाचे आयोजन करावे लागले, तेव्हापासून ही घोडदौड अशीच सुरू आहे. मुंबई, रत्नागिरी, दापोली, पुणे, बदलापूर, डोंबिवली, कल्याण, पांचगणी सर्वदूर प्रयोग झाले आणि ही मजल 17 प्रयोगांपर्यंत गेली. वेळोवेळी नावीन्य आणि संगीताची जोड दिल्यामुळे रसिकांचं आम्हाला भरभरून प्रेम मिळालं,
या कविता सामान्य जीवनातील घडामोडींशी निगडित असल्याने रसिक आपल्या आयुष्याची कवितेतून उजळणी करतात, हे या मैफिलीचे अनोखे वैशिष्टय़. या कार्यक्रमाचे संयोजन स्वामी चिंतापांडू, स्वरसाथ निखिल होले, गिटार देवेंद्र घाडी, सतार विशाल भुर्के, सिंथेसायझरवर मंदार एडनवाले साथ करणार असून निवेदन निरंजन पुरव यांचे आहे. तनुजा बेडेकर आणि प्रबंध राऊळ यांच्या कविता पल्लवी पतंगे, अमृता घाणेकर, नमिता वारणकर आणि अनुजा शिंदे-वाटवे सादर करतील.
मैफिलीचं वेगळेपण…
आपण आपला भूतकाळ बंद करून ठेवतो आठवणींच्या हातात किल्ल्या देऊन! अशा वेळी कायम वाटत रहातं तो अनुभव, तो काळ वेगळाच होता नाही का? …पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर एकदा तुझ्या-माझ्यातल्या गोष्टी जरूर पहा; कारण या फक्त आमच्या गोष्टी नाहीत तर इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या कुणासमोर न आलेल्या सिक्रेट गोष्टी आहेत. हे या कार्यक्रमाचं वेगळेपण रसिकांना या मैफिलीत नक्कीच अनुभवता येईल.
द्वितीय वर्षपूर्ती विशेष
द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त 18वा प्रयोग असल्याने आपल्यातल्याच काही प्रेक्षकांना आमच्या सोबत कविता सादर करण्याची संधी देतोय. कारण ‘तुझ्या-माझ्यातल्या गोष्टी’ म्हणजे फक्त आमच्या नसून आता त्या रसिकांच्या हक्काच्याही झाल्या आहेत. तसंच ‘आधी आभाळ भरून यायला हवं’ असं म्हणून आम्ही पाऊस आणि त्याचा नात्याशी जुळणारा संबंध अशा अनेक नव्या कविता येत्या कार्यक्रमात अंतर्भूत केल्या आहेत. नवनवीन कविता सादर करण्याची परंपरा कायम ठेवून या कार्यक्रमातही अर्ध्याहून अधिक नव्या कविता सादर केल्या जातील, अशी माहिती ते देतात.






























































