एमटीएनएल-बीएसएनएलचे विलीनीकरण, कर्मचाऱ्यांसाठी ‘व्हीआरएस’चीही योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, विलीनीकरणाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विलीनीकरणाच्या निर्णयाची माहिती दिली. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणामध्ये सरकारने 68751 कोटींच्या पुनर्रचना पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामध्ये 15 हजार कोटी रुपये बॉण्डमधून उभे केले जातील, फोर-जी स्पेक्ट्रम सेवेसाठी 20140 कोटी रुपये सरकार देणार, कर्मचाऱ्यांच्या व्हीआरएससाठी 29937 कोटींची तरतूद आणि जीएसटीसाठी 3674 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

40 हजार कोटींचे कर्ज

बीएसएनएलमध्ये 1.68 लाख कर्मचारी, तर एमटीएनएलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 22 हजार आहे. या दोन्ही कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या असून, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. दोन्हीही कंपन्यांवर तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज आहे. यामध्ये मुंबई आणि दिल्लीत सेवा देणाऱ्या एमटीएनएलवर 20 हजार कोटींचे कर्ज आहे. बीएसएनएलला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला 850 कोटी रुपये खर्च येतो.

उद्धव ठाकरे यांचे आभार!

‘एमटीएनएल’ आणि ‘बीएसएनएल’ कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संघर्ष काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठामपणे उभे राहिले. या कंपन्यांबद्दल अनेकजण विविध प्रकारची भाकिते करत होते. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करून यात लक्ष घालण्याची विनंती केली. परिणामी आज एमटीएनएल आणि बीएसएनएल कंपन्या पुनरुज्जीवित झाल्या. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे ऋणी आहोत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांचेही आभार, अशी प्रतिक्रिया अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी दिली.

कर्मचाऱ्यांसाठी ‘व्हीआरएस’ योजना

विलीनीकरणाबरोबरच सरकारने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती अर्थात व्हीआरएस योजना जाहीर केली आहे. ही योजना सक्तीची नसून ऐच्छिक आहे. कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तरच व्हीआरएस घेता येईल, असे प्रसाद यांनी सांगितले.

एखाद्या कर्मचाऱ्याचे वय 53.5 वर्षे असेल तर त्याला वयाच्या 60 वर्षांपर्यंत 125 टक्के पगार मिळेल.

सरकारने जारी केलेल्या व्हीआरएसच्या निकषामध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो.