
महसूलवाढीसाठी इन्फोसीस कंपनीच्या सीईओंनी केलेल्या हेराफेरी प्रकरणाची सेबी या शेअर बाजार नियामक मंडळाने गंभीर दखल घेतली असून त्याबाबत चौकशी सुरू केली आहे. एका व्हिसल ब्लोअरने सीईओंवर केलेल्या गंभीर आरोपांची पडताळणी करतानाच कंपनीने नेमके काय लपवले तेही जाणून घेण्याचा सेबी प्रयत्न करणार आहे. यातच कंपनीच्या शेअर्सच्या गडगडलेल्या किमतीबाबतही सेबी चाचपणी करेल अशी शक्यता आहे.
चौकशीला सुरुवात करण्यापूर्वी सेबी लवकरच कंपनीच्या व्यवस्थापन समितीला एकदा चौकशीसाठी बोलावून घेईल असे सूत्रांनी स्पष्ट केले. या चौकशीत ऑडिट आणि इतर आर्थिक बाबींबद्दल संचालक मंडळाकडून काय माहिती मिळते ते सेबीला जाणून घ्यायचे आहे. त्यावरच चौकशीची प्रगती अवलंबून आहे. गरज पडली तर कंपनीच्या संचालकांना स्वतंत्ररीत्या बोलावून घेतले जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
बीएसईनेही खडसावले
व्हिसल ब्लोअरने गंभीर आरोप केल्यानंतर त्याबाबत आपल्याला सूचना का करण्यात आली नाही असे सांगत बीएसईने बुधवारी इन्फोसीस कंपनीला खडसावले. आरोप करणाऱया कर्मचाऱयांनी कंपनीचे सीईओ सलील पारेख आणि मुख्य वित्त अधिकारी निलांजन रॉय यांच्यावर कमी वेळेत जास्त उत्पन्न जमविल्याप्रकरणी आरोप केला आहे. या दोघांकडूनही बीएसईने स्पष्टीकरण मागवले आहे.





























































