
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या एकमेव मतदारसंघात काँग्रेसविरोधात प्रचारच झाला नव्हता. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, लढत झाली ती काँग्रेसचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख आणि नोटा यांच्यामध्येच. दुसऱ्या क्रमांकाची मते या मतदारसंघात नोटाने घेतली आहेत. एकतर्फी झालेल्या या लढतीत धीरज देशमुख यांनी बाजी मारली.
या मतदारसंघात भाजपाचे रमेश कराड यांनी जोरदार तयारी केलेली होती. मात्र, भाजपाने कराड यांचे तिकीट कापले, सचिन देशमुख यांना भाजपचीच उमेदवारी होती. परंतू अचानक सुत्रे फिरली आणि त्यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गायब झालेले उमेदवार सचिन देशमुख हे थेट मतदानाच्या अगोदर उगवले. प्रचारासाठी बाबा रामदेव तसेच अभिनेता खासदार सनी देओल येणार असे जाहिर करण्यात आले होते. परंतू या मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात एकही सभाच काय पण साधी कॉर्नर बैठकही घेण्यात आली नाही. महाराष्ट्रातील हा एकमेव मतदारसंघ असावा ज्या मतदारसंघात काँग्रेस विरोधात प्रचारच करण्यात आला नाही. मात्र सर्वांनी नोटाला मतदान करावे असे जाहिरपणे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करीत होते. त्याचीच पत्रके वाटली गेली. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे धीरज देशमुख यांनी एकतर्फी विजय मिळवला.
काँग्रेस उमेदवार धिरज देशमुख यांना 67.63 मते मिळाली. तब्बल 134615 मतदारांनी त्यांना पसंदी दिली. तर दुसऱ्या क्रमांकावर नोटाला प्राधान्य देण्यात आले. नोटाला 13.79 टक्के म्हणजे तब्बल 27449 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना 6.76 टक्के मते मिळाली. 13459 मते मिळाली. वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार मंचकराव डोणे यांना 12930 मते मिळाली आहेत. पोस्टल मतदान वगळता धीरज देशमुख यांनी 107166 मताधिक्य मिळवले आहे.





























































