मुंबईत महायुतीची बाजी, महाआघाडीला केवळ सहा जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मुंबईत शिवसेना-भाजप महायुतीनेच पुन्हा एकदा बाजी मारली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच जागांवर पुन्हा एकदा समाधान मानावे लागले आहे. मुंबईतील 36 पैकी 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून काँग्रेस महाआघाडीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांना पराभवाची धूळ चारत महाआघाडीला जोरदार धक्का दिला आहे.

वर्षानुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी काँग्रेस उमेदवार नसीम खान यांना पराभवाची धुळ चारत शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी या मतदारसंघात सभा घेतली होती. भायखळा विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण विजयी झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी त्यांना पराभवाची धूळ चारत मतदारसंघ ताब्यात घेतला.

शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी विधानसभेतून हॅटट्रिक केली. सुनील प्रभू (दिंडोशी), संजय पोतनीस (कलिना), प्रकाश सुर्वे (मागाठणे), सदा सरवणकर (माहिम),अजय चौधरी (शिवडी), मंगेश कुडाळकर (कुर्ला), सुनील राऊत (विक्रोळी), रमेश कोरगावकर (भांडूप पश्चिम), रमेश लटके (अंधेरी पूर्व), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) यांनी आपापल्या जागा कायम राखत काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईत पराभवाची धूळ चारली.

भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा सलग सहाव्यांदा मलबार हिल मतदारसंघातून विजयी झाले. शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघ कायम राखला तर भाजपने बोरिवलीतून उमेदवारी दिलेल्या सुनील राणे यांनी मोठे मताधिक्य मिळवत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले. घाटकोपर पूर्वमधून नगरसेवक पराग शाह तर मुलुंडमधून मिहीर कोटेचा विजयी झाले.

भाजपच्या मनीषा चौधरी (दहिसर), अतुल भातखळकर (कांदिवली), योगेश सागर (चारकोप), विद्या ठाकूर (गोरेगाव), अमित साटम (अंधेरी प.), पराग अळवणी (विलेपार्ले), राम कदम (घाटकोपर प.), कॅप्टन तमिळ सेलवन (शीव कोळीवाडा), काँग्रेसमधून भाजपात आलेले कालिदास कोळंबकर (वडाळा) मतदारसंघाची जागा कायम राखली. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर कुलाब्यातून विजयी झाले.

महाआघाडीला केवळ सहा जागांवर यश
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेना आमदार तुकाराम काते यांचा अनपेक्षितरीत्या पराभव करून मुंबईत राष्ट्रवादीचे खाते उघडले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (धारावी), अमीन पटेल (मुंबादेवी), अस्लम शेख (मालाड पश्चिम) यांनी विजयाची हॅटट्रिक केली तर वांद्रे पूर्व येथून माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी विजयी झाले. समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी मानखुर्द मतदारसंघ कायम राखला.