
>> डॉ. विजया वाड
सरस्वती आईच्या कृपेने शकूने अगदी तिला हवा तसा नवरा पटकावला. “ती शकू दामले? तिच्यात जीव गुंतलाय तुझा?’’ सदा आश्चर्याने सुमंतला विचारीत होता.
‘‘का रे? इतकं आश्चर्य नंबर दहा कशाला तुझ्या फेसबुकवर?’’
‘‘फेसबुक? फेसला तू फेसबुक म्हणू लागलास सुम्या?’’
‘‘ती’ म्हणजे शकू म्हणते.’’ सुमंत चक्क ब्लश झाला.
‘‘बुडालास रे! त्या बुकात बुडालेल्या मुलीच्या प्रेमात पडून पार वैय्या गेलास. बुकी झालास.’’
‘‘शकूचं सारं सारं सारंच मला आवडतं रे. तिच्यासाठी मी त्या पुस्तकपेढी वाचनालयाचा मेंबर झालो. तिच्यासमोरचं टेबल मी धडपड करून पकडतो नि शकू वाचते, मीही वाचतो. फक्त फरक इतकाच, मी शकूचा चेहरा वाचतो नि ती पुस्तक. वाचता वाचता ती हसते तेव्हा मी थुई थुई कारंजे होतो.’’
‘‘हो का? थुई थुई? आम्हाला फक्त ‘थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा’ ठाऊक आहे. ‘थुई थुई कारंज्यात नाचला सुमंत’ नाही बॉ ठाऊक.’’
‘‘वाचता बघतो… कॉलेजात बघतो… रस्त्यावर बघतो नि वेडा, वेडसर, वेडेस्ट होतो बघ मित्रा.’’
‘हो का? मला फक्त बॅड, वसई, वर्स्ट हेच ठाऊकी आहे.’’
‘‘मित्रा… बॅड, वर्स, वर्स्ट नव्हे रे? गुड, बेटर, बेस्ट! ती चांगल्याची वाहक आहे. शकुनांची पर्वणी आहे. गुडदाणी आहे. काय सांगू तुला? शकू म्हणजे शुभसंकेत! शकू म्हणजे आनंदाची पर्वणी! शकू म्हणजे गुडदाणी… अत्तरदाणी – फुलराणी… मंजूळ गाणी…’’
‘‘हे बघ, शकू मला हवी असेल तर मला हे सर्व करावेच लागेल. कारण तिला पुस्तकप्रेमी नवरा हवा आहे.’’‘‘हो का?… हे तुला कसं कळलं?’’
‘‘शादी डॉट कॉमवर आहे. मी पुस्तकपेमी आहे. मला पुस्तकप्रेमीच हवा.’’
‘‘अरे बापरे!’’‘‘मी रोज एका पुस्तकाचे नाव पाठ करतो.’’
‘‘वा वा! न वाचता? किती मस्त आयडियाची कल्पना रे!’’‘‘सोप्पय. फक्त पुस्तकाच्या मागच्या दहा ओळी वाचायच्या नि मुखपृष्ठ बघून ठेवायचं. हो गया काम. हल्ली मी दर रविवारी रद्दीच्या दुकानातून एक-दोन पुस्तकं घेतो. रद्दीच्या भावात कपाट सजलंय बघ.’’
‘‘अरे वा! मस्त मस्ताड रे!’’
‘‘आज पुलंचं गणगोत नि वपुंचं वपुर्झा मिळालं.’’
‘‘रद्दीत?’’‘‘हो रे! लोकांना चाड नाही.’’ सुमंत म्हणाला.
‘‘खरंच रे!’’
‘‘आज ब्लर्ब वाचून जाणार नि तिच्यावर इंप मारणार.’’
‘‘शुभेच्छा मित्रा!’
‘‘धन्यवाद सदा.’’
तो ती दोन्ही पुस्तके चाळून ‘डेट सज्ज’ झाला. आज तिला भेटायचे तर मस्त दिसले पाहिजे. रणबीर कपूर कोणता सेंट मारतो अंगावर? काही काही आठवत नाही. सारखा टीव्ही पाहावा लागतो रेफरन्ससाठी. फॅशन ट्रेंड कळावा म्हणून. ‘‘सुम्या कुठे चाललास यवढा नटून थटून? नि किती सेंट मारला आहेस मवाल्यासारखा?’’ आईने अडवल्यावर थांबावे लागले. क्या करे? आईका हुकूमनामा!
‘‘अगं, मित्राला भेटायला चाललो आहे.’’ तो खोटं बोलला.
‘‘मित्राला वाटत नै. मैत्रिणीला वाटतंय.’’
‘‘काय फरक पडतो?’’
‘‘हल्ली तुझं त्या शकू दामलेसाठी फार्फार जीव टाकणं चाललंय म्हणे. एक नंबरची आळशी, कामचुकार, वाचनवेडी मुलगीय ती. सून मटेरियल बिल्कुल नाही.’’
‘‘हे तुला कोणी सांगितलं आई?’’ सुमंतने आश्चर्याने विचारले.
‘‘तू भोळा सांब आहेस अगदी. तुला नाही हो जमायचे बायको मटेरियलची मुलगी शोधणे. ते काम माझ्यावर…’’ तिचे बोलणे ऐकायला तो थांबतोय थोडाच? पळाला भुर्रर्र. आज त्याची शकू दामलेसोबत हॉटेल गुरुकृपात डेट होती. तो तिच्याशी पुस्तकांबद्धल किती किती बोलणार होता. त्याने मनाशी पुनः पुन्हा उजळणी केली.
‘वपु म्हणजे जनसामान्यांचे आवडते लेखक. त्यांची भाषा, त्यांचे कथाविषय, त्यांची काय बरं? हां, कथनशैली! सारंच न्यारं. त्यांचं ‘वपुझा’& हे पुस्तक या साऱया गुणसमुच्चयाची साक्ष देतं. पुलंची तर बातच न्यारी. पुलंचा सारा पुस्तकभार मी विकत घेतलाय. बय प्रिये. तू वाचनवेडी… मी वाचनवेडा. काय सुंदर दिसेल प्रिये आपला जोडा!’ त्याने सर्व उजळणी विशेषतः ‘गुणसमुच्चय’, ‘पुस्तकसंभार’ हे शब्द एकवीस वेळा म्हणून बघितले. हो ! चूक व्हायला नको.
गुरुकृपात शकू दामले आली तेव्हा त्याला वाटले सोनचाफाच आला. तिच्या हातात एक पुस्तक होते. अंगावरचे सोनसळी वस्त्र तिला विलक्षण शोभत होते. ‘किती छान दिसतेस. गोग्गोड एक्कच देतेस? की मी घेऊ?’ त्याला विचारायचे होते. पण धीरच झाला नाही.
‘‘पुल आणि वपु हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांचा सारा पुस्तकसंभार मी खरेदी केला आहे. त्यातली कितीक वाक्ये मला मुखो… मुखो…’’ तो अडला. हिला ‘पुस्तकप्रेमी’ हवा… कसे व्हायचे आपले?
‘‘मुखोद्गत म्हणायचंय का तुला?’’ शकूने विचारलं. ‘हो’ त्यानं मान हलवली. तेव्हा शकू गोग्गोड हसली. चक्क त्याचे हात हाती घेऊन म्हणाली, ‘‘वपु नि पुल राहू देत याक्षणी. आशीर्वादच आहेत त्यांचे सदा… त्यांच्या वाचकांवर. ही वाचनवेडी शकू तुला खूप खूप आवडली आहे सुमंत? अरे, त्यासाठी तुला वाचनवेडे असण्याची गरज नाही. मला वाच! मला किनै एक उमदा, देखणा, पगारदार, सुशिक्षित, निर्व्यसनी जोडीदार हवाय. तसा तू आहेस. और क्या चाहिए? ही वाचनवेडी फक्त पुस्तके वाचेल. मात्र स्वयंपाकास आपण बाई ठेवू हं!’’ लाडे लाडे भावी पतीच्या गळी सारे उतरवले तिने नि फुकटचा दहीवडा खाऊन वाचनालयात गेली.

























































