
>> स्पायडरमॅन
सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर जगभरातच वेगवेगळे संशोधन चालू आहेत. ही कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांत मानवाला खूपच फलदायी ठरणार असल्याबद्दल अनेक दिग्गज शास्त्रज्ञांचे मत आहे. मात्र त्याचबरोबर ही कृत्रिम बुद्धिमत्ता हाताबाहेर गेली आणि या तंत्रज्ञानावर वचक राहिला नाही तर हे मानवा जातीचे अत्यंत नुकसान करू शकणारे ठरू शकते असेही अनेक मान्यवर तंत्रज्ञ सांगत आहेत. मात्र तरीही अनेक मोठय़ा कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेतच.
एलन मस्क या तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या उद्योजकाची कंपनी ‘OpenAI’ ही रिसर्च कंपनी याच क्षेत्रात काम करत असून त्यांनी नुकताच एक रोबोट हॅण्ड बनवलेला असून हा हात सहजपणे रुबिक क्यूबची पझल सोडवू शकतो. सामान्य माणसाला जिथे हे कोडे सोडवताना दोन हात वापरावे लागतात तिथे हा हात सहजपणे एकटय़ाच हाताने हे कोडे सोडवू शकतो. या हाताला आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आलेली आहे. ‘Dactyl’ असे नाव देण्यात आलेला हा हात म्हणजे नुसती सुरुवात असून मानवी बुद्धिमत्तेच्या तोडीचे तंत्रज्ञान प्रगत करण्याच्या दृष्टीने ही सुरुवात असल्याचे अनेक तंत्रज्ञ मानत आहेत. रुबिक क्यूब सोडवण्यासाठी एकूण 43,252,003,274,489,856,000 इतक्या पद्धती आहेत असे तज्ञ सांगतात. हा रोबोट फक्त पंजाच्या हालचालीने या सगळ्या पद्धती वापरून सहजपणे ही रुबिक क्यूब सोडवू शकतो. रुबिक क्यूबच्या या क्षेत्रात अनेक कंपन्या आपले आपले संशोधन करतच होत्या. गेल्याच जुलैत University of California at Irvine ने एका सेकंदात ही रुबिक क्यूब सोडवू शकणारा रोबोट तयार केल्याचा दावा केलेला होता. मानवाची रुबिक क्यूब सोडवण्याची जागतिक मान्यताप्राप्त ही वेळ दोन सेकंद आहे. या दृष्टीने बघता हा रोबोट अत्यंत जलद ठरणारा आहे.





























































