सिंधुदुर्गात ‘क्यार’ची नांदी, जोरदार लाटांनी किनारपट्टी हादरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘क्यार’ चक्रीवादळाच्या नांदीने सिंधुदुर्ग किनारपट्टी हादरली आहे. सोसाटय़ाचा वारा आणि धडकणाऱ्या अजस्र लाटांच्या उधाणाचे पाणी मालवण तालुक्यात आचऱ्यातील जामडूल बेट, मेढा राजकोट, देवबागसह शहरातील किनारपट्टीवरील वस्तीत घुसले. वेंगुर्ले येथे खाडी किनाऱ्यावरील मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी परिस्थितीमुळे तामीळनाडू, मद्रास, कर्नाटक, गुजरात राज्यांसह मुंबईतील मच्छीमारी नौका देवगड बंदरात सुरक्षितरीत्या नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या 12 तासांत हे वादळ कोकण आणि गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.