‘क्यार’ कोकणच्या दिशेने सरकतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताशी पाच किमी अशा वेगाने ‘क्यार’ वादळ कोकणच्या दिशेने सरकतेय. यामुळे ऐन दिवाळीत भात कापणी संकटात आली असून शेतकरी चिंतेत आहे. सिंधुदुर्गात लाटांनी जोरदार तडाखे देण्यास सुरुवात केली असून किनारपट्टी भाग भयभीत झाला आहे.

आचरा जामडूल बेटाला पाण्याचा विळखा

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास आलेल्या समुद्राच्या उधाणाचा फटका आचऱयातील पिरावाडी, जामडूल बेटाला बसला. यात खाडीचे पाणी जामडूल, पिरावाडी येथील खाडी किनारपट्टीलगतच्या घरांमध्ये गेल्याने घरांतील अन्नधान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही दूषित झाल्या असून काही मच्छीमारांच्या जाळय़ांचेही नुकसान झाले आहे. तीन तासांनंतर पाणी ओसरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी पुढील दोन दिवस उधाणाचा धोका कायम असल्याने जामडूल बेटावरील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टीवर 204.5 मिमी इतका पाऊस पडेल. तसेच शनिवारी ताशी 70 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित किनारपट्टीवर, उत्तर कर्नाटक किनारपट्टी, गुजरातची किनारपट्टी येथे ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील.
  • सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसणार असल्याने या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मच्छीमारांना दोन दिकस समुद्रात जाण्यास मज्जाक करण्यात आला आहे.

बंदर विभागाचा धोक्याचा बावटा कागदावर

किनारपट्टी भागात धडकणाऱया वादळाची पूर्वसूचना देणारा धोक्याचा 3 नंबर बावटा लावण्यात यावा यासह वादळाची माहिती देणारा संदेश बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून मालवण बंदर विभागास गुरुवारी प्राप्त झाला. जिल्हा प्रशासनाकडूनही लेखी पत्र आले, मात्र मालवण राजकोट येथील धोक्याचा बावटा उभारणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्याने वादळ धडकले तरी बंदर विभागास बावटा लावता आला नाही. याबाबत होडी वाहतूक संघटना व मच्छीमार यांनी संताप व्यक्त केला. बंदर विभागाच्या कारभाराबाबत किल्ला होडी संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

परतीचा नव्हे, हा चक्रीवादळाचा पाऊस!

ऐन दिवाळीत आलेल्या मुसळधार पावसामुळे परतीचा पाऊस परतला असेच राज्यातील जनतेला वाटत असले तरी हा परतीचा पाऊस नसून दक्षिण-पश्चिम हिंदुस्थान तसेच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे हा अचानक पाऊस आलेला आहे, अशी माहिती हवामानतज्ञ तथा एमजीएम संचालित अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

थंडीत अचानक वाढ अपेक्षित

उत्तर व मध्य हिंदुस्थानात दाखल झालेली थंडी अद्याप महाराष्ट्रात दाखल झाली नाही. सध्या सुरू असलेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाने ही स्थिती निर्माण केली आहे. उद्या सकाळपर्यंत ‘क्यार’ हे गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीजवळ असेल. त्यामुळे उत्तर दिशेने वाहणारे वारे दक्षिण-पश्चिम दिशेला सरकतील़ त्यामुळे थंडी घेऊन येणारे पश्चिमी विक्षेपीय वारे अर्थात ध्रुवीय वारे महाराष्ट्रात दाखल होतील. त्यामुळे थंडीत अचानक वाढ अपेक्षित आहे. किमान तापमानात चार ते पाच अंशांची घट अपेक्षित आहे.