
>> नयना भगत
दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण! हिंदू हे तेजाचे उपासक असल्याने दिवाळीमध्ये दीप लावून अग्निनारायणाची उपासना केली जाते. आता तर हिंदुस्थानी लोक जगभर विखुरल्याने ही संस्कृतीही सर्वत्र पोहोचली आहे आणि सातासमुद्राच्या सीमा ओलांडत जगभरात हा सण साजरा केला जात आहे.
विश्वात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लय पावल्या; पण प्राचीन हिंदू संस्कृती ही एकच अशी संस्कृती आहे, जी काळाच्या कसोटीवर टिकून राहिली आहे; किंबहुना तिचा सर्वदूर प्रसार होत आहे. मुळातच हिंदू संस्कृती आणि त्यामध्ये सांगितलेले सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांचा मूळ गाभा चैतन्याचा असल्याने आजही हे सण-उत्सव उत्साहाचे वातावरण निर्माण करतात.
दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण! हिंदू हे तेजाचे उपासक असल्याने दिवाळीमध्ये दीप लावून अग्निनारायणाची उपासना केली जाते. दिवाळीच्या कालावधीत दक्षिणायन चालू असल्याने सूर्यास्त लवकर होऊन सर्वत्र लवकर अंधार पसरतो. या अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करून ज्ञानरूपी तेजाचे प्रक्षेपण करण्यासाठी दिवाळीत सर्वत्र दिवे लावले जातात. दिव्याच्या ज्योतीमुळे वातावरणाचीही शुद्धी होते. हिंदुस्थानीं लोक जगभर विखुरल्याने ही संस्कृतीही सर्वत्र पोहोचली. दिवाळी या सणाने तर सातासमुद्राच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत.
नेपाळ – लेखिका कल्याणी गाडगीळ यांनी देश-विदेशात साजऱया केल्या जाणाऱया दिवाळीविषयी माहिती संकलित केली आहे. त्यामध्ये त्या लिहितात, ‘नेपाळमध्ये दिवाळी हा सण ‘तिहार’ म्हणून साजरा केला जातो. यातील पहिल्या ‘काग तिहार’च्या दिवशी कावळय़ांसाठी गोडधोड पदार्थ घराच्या छपरावर ठेवून दिले जातात. दुसऱया म्हणजे ‘कुकुर तिहार’च्या दिवशी माणसाच्या कुत्र्याशी असलेल्या अतूट नात्याचा आदर म्हणून कुत्र्याची आरती केली जाते. कुत्र्याला कुंकवाचा टिळा लावून गळय़ात झेंडूची माळ घालून त्याला गोडधोड दिले जाते. नंतर ‘गायतिहार’ म्हणजे गाईची पूजा आणि शेवटी लक्ष्मीपूजनही होते.
इंडोनेशिया आणि सिंगापूर – इंडोनेशियातील बाली बेटावर देवळांना दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी केली जाते. सिंगापूर येथे सार्वजनिक आतषबाजीला बंदी आहे; मात्र दिव्यांची आरास करताना हिंदुस्थानचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे रूप सगळीकडे विपुल प्रमाणात वापरलेले दिसते.
मलेशिया – मलेशियामध्ये दिवाळीत शॅडो पपेट सावल्यांचा खेळ मोठय़ा प्रमाणात दाखवला जातो. या माध्यमातून रामायण आणि महाभारत यांच्या कथा सांगितल्या जातात.
थायलंड आणि फिजी – थायलंडमध्ये दिवाळी ‘लुई क्रॅथोंग’ म्हणून साजरी केली जाते. केळीच्या झाडाच्या पानांपासून बनवलेले सहस्र दिवे नदीमध्ये सोडले जातात. फिजी या पॅसिफिक बेटात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. या वेळी वेगवेगळय़ा स्पर्धा आयोजित केल्या जातात. पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धांना आरंभ होतो.
इंग्लंड आणि न्यूझीलंड – लंडन शहरातूनही दिवाळीनिमित्त मोठी मिरवणूक निघते. यामध्ये हिंदुस्थानी नाच आणि कपडे यांचे मनोहारी दर्शन होते. न्यूझीलंडच्या ऑकलंड आणि वेलिंग्टन या शहरांत दिवाळीच्या दोन आठवडे आधी मेळा साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले जाते. ‘बी हाइव्ह’ या संसदेच्या इमारतीसमोर भलीमोठी रांगोळी काढली जाते. तेथील हिंदुस्थानी मंदिरांमधून अन्नकुटाचे आयोजन होते.’
श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार आणि दुष्ट प्रवृत्ती यांपासून मुक्त केले अन् प्रभुविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले. तीच ही ‘दीपावली’. आपण वर्षानुवर्षे केवळ एक रूढी म्हणून साजरी करत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरूपी अंधःकाराचे, तसेच भोगवृत्ती आणि अनाचारी, आसुरी वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य न्यून (कमी) होऊन त्यांचे सज्जन शक्तीवरील वर्चस्व न्यून होईल.
हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा
केवळ सण-उत्सवांच्या निमित्तानेच नव्हे, तर प्राचीन मंदिरे, तेथील प्रथा-परंपरा यांमधूनही विदेशातील प्राचीन हिंदू संस्कृतीचे अस्तित्व दिसून येते. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरू अंजली गाडगीळ यांच्यासह चार जणांनी आग्नेय आशियाचा अभ्यासदौरा केला. या दौऱयाच्या वेळी विदेशातील प्राचीन हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहायला मिळाल्या.
इंडोनेशिया – इंडोनेशिया एक द्वीपसमूह अणि मुसलमानबहुल राष्ट्र असले तरी तेथे महान हिंदू संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात. हिंदुस्थानपासून 4 सहस्र किलोमीटर दूर असलेल्या इंडोनेशिया बेटावर पूर्वीपासून हिंदू संस्कृती कशी विद्यमान होती याचे उदाहरण म्हणजे पेट्रोलपंपावर द्वारपाल म्हणून स्थापन केलेली श्री गणेशमूर्ती! 15व्या शतकापर्यंत इंडोनेशियात हिंदू राजांचे राज्य होते. तेथील जावा द्वीपावर अनेक शतकांपासून रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाटय़ कला प्रसिद्ध आहे. योग्यकर्ता शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर ‘प्रंबनन’ नावाचे गाव आहे. येथे ‘चंडी प्रबंनन‘ नावाचा मंदिरांचा समूह आहे. ‘चंडी‘ म्हणजे मंदिर आणि ‘प्रबंनन म्हणजे परब्रह्मन्’. ‘परब्रह्म मंदिर समूह’ असा याचा अर्थ होतो. एके काळी विश्वातील सर्वांच उंच असलेले हे मंदिर पाहण्यासाठी प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. या मंदिराच्या भव्य परिसरात प्रतिदिन सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाटय़ सादर केले जाते.
श्रीलंका आणि जपान ः श्रीलंकेतील कोलंबो शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱया ‘केळनिया’ या गावात बिभीषणाचे एक प्राचीन मंदिर आहे. जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने केली जाते. जपानी जीवनात ज्ञान आणि आपुलकी या सद्गुणांतून प्राप्त होणाऱया शक्तींचे प्रतीक म्हणजे श्री गणेशाचे स्वरूप असे मानले जाते. 11 व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिर’ हे येथील सर्वांत प्राचीन मंदिर आहे. इ.स.पूर्व 806 मध्ये ‘कोबोदेशी’ या जपानी संतांनी चीनचा प्रवास करून जपानमध्ये मंत्रायाना या पंथाचे ग्रंथ, विविध मूर्ती, तसेच धार्मिक ग्रंथ आणले होते. याच संतांनी जपानमध्ये हिंदू देवतांच्या प्रार्थना आणि पूजा करायला आरंभ केला. जर्मनीचा विचारवंत फिलीप फ्रांझ व्हान शिबोल्ड याने वर्ष 1832 मध्ये टोकियो (सध्या जपानची राजधानी) शहरात श्री सरस्वती देवीची 131 मंदिरे आणि श्री गणेशाची 100 मंदिरे मोजून त्यांची संख्या नमूद केली होती. जपानच्या कुसा या भागातील 12व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिरा’ला राष्ट्रीय संपत्ती मानले जाते.
मलेशिया आणि थायलंड – याशिवाय मलेशिया, थायलंड येथील मंदिरे, तेथील प्रथा यांद्वारे तेथे असलेल्या हिंदू संस्कृतीची ओळख होते. ही उदाहरणे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. अभ्यासाअंती विश्वभर पसरलेली हिंदू संस्कृती, तिचे वैशिष्टय़, उपासनांमधील समान धागा याची आपल्याला प्रचीती येते. सण-उत्सव धर्मशास्त्राला अनुसरून साजरे करता येऊन धर्माचरणातील आनंद सर्वांना घेता येवो, हीच प्रार्थना!


























































