कश्मीर खोऱयाला स्वायत्तता देणारे 370 कलम हटविल्याने चवताळलेल्या पाकिस्तानचा राग अजूनही शांत झालेला नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱयासाठी आपल्या हवाई हद्दीतून जाण्यासाठी प्रवेश देण्यास पाकिस्तानने रविवारी पुन्हा मनाई केली. हिंदुस्थान प्रशासनाला हा निर्णय कळविण्यात आल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मोदींना आपली हवाई हद्द वापरण्यास परवानगी नाकारल्याचे इस्लामाबादमधील रेडिओद्वारे जाहीर केले. जम्मू-कश्मीरमधील जनतेच्या मनात 370 कलम हटविल्याची जखम अजूनही भळभळत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही कुरेशी यांनी सांगितले. पाकिस्तानने रविवारी कश्मिरी जनतेसाठी ‘ब्लॅक डे’ पाळला.
मोदी, कोविंद यांनाही रोखले होते
यापूर्वी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील संसदेला भेट देण्यासाठी जाणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास मनाई केली होती. त्यापाठोपाठ पाकिस्तानने हिंदुस्थानचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आयर्लंड येथे जाण्यासाठीही आपली हवाई हद्द वापरू दिली नव्हती. येत्या सोमवारी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियामध्ये जाणार आहेत. तेथे ते आंतरराष्ट्रीय व्यावसायिक चर्चासत्रात सौदीमधील टॉपच्या अधिकाऱयांशी चर्चा करणार आहेत. मोदींच्या सौदीमधील या चर्चेमुळेच पाकिस्तानला पोटशूळ उठला आहे.




























































