
भोकरदन जालना रस्त्यावरील लिंगेवाडी फाट्याजवळ सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोन अवजड वाहनांची टक्कर झाली. अपघातात उत्तर प्रदेशमधील वाहनचालक मोहमद दानिश खान याचा जागीच मृत्यू झाला. तर बिजेन्द्रसिंग कुमार या हरयाणातील तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. एपघातातील आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे.
भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील लिंगेवाडी पाटीजवळ जालन्याहून भोकरदनकडे जाणाऱ्या आयशर ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकशी टक्कर झाली. या अपघातात जालन्याकडून भोकरदनकडे येणाऱ्या आयशर गाडीचा चालक मोहमद दानिश खान याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा भाचा सुभान एकलाख मोहम्मद गंभीर जखमी झाला आहे. तर भोकरदनहून जालन्याकडे जाणाऱ्या आयशर गाडीचा चालक हरयाणातील बिजेंद्रसिंग कुमार याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मोहमद दानिश खान याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.



























































