
पावसाळा अधिकृतरित्या संपल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी अनधिकृतरित्या पडणाऱ्या पावसाळ्याने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ही तीन राज्ये हैराण झाली आहे. घरी परत चाललेल्या पावसाला क्यार नावाच्या चक्रीवादळ दोस्ताने गळ्यात हात घालून पुन्हा कोकण किनारपट्टीवर आणून सोडलं होतं. या पावसामुळे कोकणात आणि गोव्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला असून 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता येत्या काही दिवसात वाढणार असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे. पुढचे काही दिवस गोव्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडतील आणि 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गोव्यामध्ये मोसमी पावसाला यंदा उशिरा सुरुवात झाली होती. ही तूट भरून काढत गोवेकरांना कंटाळा येईपर्यंत पाऊस बरसत राहिला. या पावसामुळे गोव्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पावसाला सुरुवात झाल्यापासून 30 सप्टेंबरपर्यंत गोव्यामध्ये 155 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली होती.
पावसाने गोव्यामध्ये सरासरी केव्हाच ओलांडली असून ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आता नोव्हेंबरमध्येही पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने गोवेकरांच्या पोटात गोळा आला आहे. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असल्याने इथल्या हॉटेल व्यावसायिकांनाही धडकी भरली आहे. गोव्यामध्ये पावसाळा संपल्यानंतर अवघे पाच दिवस उघडीप मिळाली आहे. ऑक्टोबर महिन्यात गोव्यामध्ये सरासरी 149.5 मिलीमीटर पावसाची नोंद होते. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोमवारपर्यंत तब्बल 540.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.





























































