बीड जिल्ह्याला पावसाने झोडपले; नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
beed-water-level

परतीच्या पावसाने दुष्काळी बीड जिल्ह्यात पाणी प्रश्न सुटला असला तरी सोमवारी रात्रभर पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. ढग गर्जनासह पहाटे पर्यन्त पावसाचा रुद्रावतार बीड जिल्ह्याने अनुभवला. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले, जवळपास सर्वच नद्यांना पूर आला. लघु मध्यम प्रकल्प खचाखच भरले, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला एकीकडे पाणी प्रश्न सुटल्याची गोड बातमी असली तरी दुसरीकडे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला, ऊस सोडता सर्वच खरीप पिके नेस्तनाबूत झाले आहे. कापूस, बाजरी, तूर, सोयाबीन सारखा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, सोमवारी रात्रभर पावसाने बीड जिल्ह्याला झोडपले, मेघ गर्जनांसह विजेचा थयथयाट अन धो धो पाऊस यामुळे पावसानेच दिवाळी साजरी केली. जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्प खचाखच भरले आहेत, नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, वडवणी तालुक्यात अनेक गावातील नदीवरील पूल खचले आहेत. अप्पर कुंडलिका प्रकल्प भरला आहे. मामला तलाव धोक्याखाली आहे, अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, या गावाचा संपर्क तुटला आहे. मामला गावातील लोक घाबरले आहेत.