मालवणचा ऐतिहासिक पालखी उत्सव उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित खोत

चक्री वादळाचा तडाख्यामुळे मालवण किनारपट्टीवरील मासेमारी व पर्यटन हे दोन्ही प्रमुख व्यवसाय ऐन दिवाळी-पर्यटन हंगामात ठप्प झाले. एकूणच मालवणच्या अर्थकारणाला ‘ब्रेक’ लागला. मात्र याच दरम्यान साजरा होणारा मालवणचा ऐतिहासिक पालखी उत्सव मालवणकरांनी मोठ्या भक्तिमय उत्साहात साजरा केला.

कोकण म्हटले की येथील प्रत्येक सण, उत्सवाला वेगळी परंपरा जोडलेली असते. प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. काहीवेळा खिशात पैसे नसतील मात्र ऋण (कर्ज) काढून येथील माणूस सण साजरा करतो. मग तो गणेशोत्सव असो नाहीतर दिवाळी. देवावर अपार श्रद्धा असलेल्या कोकणी माणसाचे हेच स्पिरिट मालवणच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यातून दिसून आले.

मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर नारायण यांचा पालखी सोहळा दिवाळी-पाडव्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक शिवकालीन पालखी सोहळा दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा होतो. मात्र यावर्षी दिवाळी आधी चार दिवस क्यार वादळाने आणि पावसाने किनारपट्टीला तडाखा दिल्याने पालखी सोहळा नियोजित दिवशी होणार का याचीच चर्चा मालवणात सुरू होती. मात्र वादळाने आपली दिशा बदलल्याने धोका टळला आणि देवस्थान कमिटीनेही याबाबत बैठक घेऊन पालखी सोहळा नियोजित दिवशीच होणार असे जाहीर केले. त्यानुसार सर्व अडचणींवर मात करत मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर- नारायण दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पालखीत बसून मालवणच्या परिक्रमणेसाठी बाहेर पडली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव रामेश्वर नारायण मानकरी व आपल्या रयतेसह पालखीत बसून परिक्रमणेसाठी प्रस्थानकर्ते झाले.

पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण मालवण नगरी सजली होती. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मार्गावर रांगोळ्या, पताका व स्वागत कमानी उभारल्या होत्या. श्री देव रामेश्वर- नारायणाने परिक्रमणेसाठी देऊळवाडा येथून आपली राऊळे सोडली. देऊळवाडा येथे सातेरी देवीची भेट घेऊन आडवण मार्गे वायरीकडे निघाली. आडवण भागात अतिवृष्टीमुळे शेतमळ्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले असताना त्याची तमा न बाळगता भाविकांनी पाण्यातून वाट काढत पालखी पुढे नेली. आडवण येथे पालखीचे जल्लोषी स्वागत झाले. दुपारी दोन वाजता पालखी वायरी तानाजी नाक्यावर येताच पालखीवर पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. वायरी तानाजी नाका येथून भक्तांना दर्शन देत देत श्री देव रामेश्वर- नारायण वायरी भूतनाथ येथील श्री भूतनाथच्या भेटीला गेले. त्याठिकाणी रितिरिवाजानुसार मंदिरात श्रीफळ ठेवून भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांनतर सायंकाळी ही पालखी मिरवणूक वायरी समुद्रकिनारीमार्गे ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले त्या मोरेश्वर म्हणजेच मोरयाचा धोंडा येथे पोहोचली. याठिकाणी मच्छिमार व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोरेश्वराच्या भेटीनंतर पालखी दांडी येथील श्री दांडेश्वर च्या भेटीला थांबली. पालखीच्या स्वागतासाठी वायरी- दांडी येथील मच्छीमारांनी जय्यत तयारी करून फुलमाला व पताक्यांनी आपल्या नौका सजविल्या होत्या.

या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मालवणनगरी व बाजारपेठ सजली होती. प्रत्येक घर व दुकानांमध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मालवण उजळून निघाले होते. खाद्य पदार्थ व कोल्ड्रिंक्सची दुकाने- स्टॉल, हॉटेल्स गजबजून गेली होती. वादळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पालखी सोहळ्यातील गर्दीवर परिणाम जाणवला. वादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, पर्यटनाला बसलेला फटका, बाजारपेठेतील मंदीचे सावट दिसून आले. दरवर्षी पालखी सोहळ्यात मोठी आर्थिक उलाढाल होत असताना अलिकडच्या काही वर्षात बाजारपेठेतील आर्थिक उलढालीचा आकडा कमी होताना दिसत आहे. त्यातच यावर्षी वादळाची पार्श्वभूमी व गर्दीवर झालेला परिणाम व ग्राहकांचा निरुत्साह यामुळे व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलढालीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

मच्छिमार व पर्यटन व्यवसाईकांचे गाऱ्हाणे

मछिमारांसोबतच नागरिकांनी पालखी समोर नतमस्तक होत दर्शन घेत साकडे घातले. वादळामुळे मत्स्यव्यवसायाला आणि समुद्री पर्यटन व्यवसायाला जो फटका बसला त्यातून सावरत व्यवसायाला बरकत यावी व मच्छीमारांवर आलेली संकटे दूर व्हावीत यासाठी मच्छिमार बांधवांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी रामेश्वर- नारायणाला गाऱ्हाणे घातले.