मिठागरांच्या जागेवर मीठच, नो कन्स्ट्रक्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत परवडणारी घरे उभारण्यासाठी मिठागरांच्या जमिनी वापरण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बाजूला ठेवली आहे. मिठागरांच्या जमिनीवर कोणतेही बांधकाम न करता तिथे मिठाचेच उत्पादन वाढवले जाणार आहे. त्यासाठी मास्टर प्लॅन बनवण्यास एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.

मिठागरांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, परंतु पर्यावरणवाद्यांकडून त्याला विरोध झाला होता. मिठागरांच्या जागेवर बांधकाम केले गेले तर मुंबईत महापुराची दाट शक्यता आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतरही मुंबईत महापूर येऊ नये यासाठी मिठागरे कायम राहिली पाहिजेत असे तज्ञांचेही मत होते.

पर्यावरणतज्ञांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱयानंतर गृहनिर्माण प्रकल्पाची सरकारची योजना बारगळली. आता मिठागरांच्या जमिनीवर मिठाचेच उत्पादन कसे वाढवता येईल याची योजना बनवली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्यात आल्या असून 6 डिसेंबरपर्यंत त्या निविदा पाठवण्याची शेवटची तारीख आहे.