
लंडन प्रिजन सेलमध्ये माझे मानसिक स्वास्थ्य अतिशय बिघडले आहे. मी अतिशय तणावाखाली आहे. त्यामुळे मला जामीन मिळावा असा अर्ज 13 500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याने लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात दाखल केला आहे. 48 वर्षीय नीरवचा हा जामिनासाठीचा पाचवा प्रयत्न आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी 6 नोव्हेंबरला होणार आहे. आपली तुरुंगातून मुक्तता करून आपल्याला नजरकैदेत ठेवावे अशी मागणीही नीरवने अर्जात केली आहे.
हजारो कोटींचा आर्थिक घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगचे आरोप असलेल्या फरार नीरव मोदीला सध्या लंडनच्या वाण्डस्वर्थ या तुफान गर्दीच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच आपले मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचा बहाणा करीत नीरवने आता पाचव्यांदा जामिनासाठी अर्ज केला आहे. मोदीच्या जामीन अर्जावरील सुनावणी व्हिडीओ लिंकद्वारे होईल किंवा न्यायालयाला आवश्यक वाटल्यास त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात येईल.
प्रत्यार्पणाची सुनावणी पुढील वर्षी
11 ते 15 मे या कालावधीत हिंदुस्थान सरकारने केलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या मागणीवरील सुनावणी पुढील वर्षी 11 ते 15 मे 2020 या कालावधीत पूर्ण होईल अशी माहिती वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या न्यायमूर्ती नीना टेम्पिया यांनी दिली. मात्र पुढील वर्षी फेब्रुवारीत सुरू होणाऱया ‘कॉल ओव्हर हियरिंग’साठी नीरवला दर 28 दिवसांनी व्हिडीओ लिंकद्वारे हजर राहावे लागेल असेही न्यायमूर्ती टेम्पिया यांनी स्पष्ट केले.



























































