
राजकीय जाहिरातींबाबत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर बंदी आणली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी आज याबाबतची घोषणा केली.
22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ‘इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठीक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणात या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असते’, असे ट्विट जॅक डॉर्सी यांनी केले.
ट्विटरच्या या निर्णयावर अमेरिकेच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे मॅनेजर ब्रेड पास्कल यांनी ट्विटरच्या निर्णयावर सवाल उपस्थित केलेत.
फेसबुकचा जाहिरातबंदीस नकार
फेसबुकने मात्र राजकीय जाहिराती बंद करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जाहिराती म्हणजे उमेदवार किंवा त्यांच्या समर्थक गटांचा आवाज असतो. राजकीय नेते किंवा त्यांच्या बातम्यांना सेन्सॉर करण्याचा खासगी कंपन्यांना अधिकार नाही, असे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्याकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिलरी क्लिंटन यांनी फेसबुकला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे, तसेच त्यांनी ट्विटरच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. फेसबुकचे जगभरात 2.8 अब्ज युजर्स आहेत.



























































