तानाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद शिंदे

तानाजी घाडगे. पंढरपूरपासून दरमजल प्रवास सुरू झाला. मालिका… चित्रपट… या मोहमयी दुनियेतील वास्तव अजूनही डाचतं आणि त्यांच्यातील तानाजी दंड थोपटून उभा राहतो.

असा त्रास होतो ना मिलिंदराव, आपण कुठल्या मेहनतीनं सिनेमा तयार करतो. त्यांच्या बजेटमध्ये तयार करतो. त्यांनी सांगितलेल्या दिवसांत चित्रीकरण पूर्ण करून देतो, कमीत कमी साधनसामग्री, लोकेशन आणि वेळेत सेन्सॉर करून देतो. पण सिनेमा काही निर्माते घरात घेऊन बसतात रिलीजच करत नाहीत… त्यांना सिनेमा घरात ठेवून काय समाधान मिळतं कुणास ठाऊक?’’
तानाजी घाडगे त्राग्यात व्यक्त होत होते. त्या पाठीमागे त्यांचं त्यांच्या कलाकृतीवरचं असतेलं प्रेम जाणवत होतं.
“दोन-दोन, तीन-तीन वर्ष सिनेमा जवळ ठेवतात, विनाकारण. अहो सिनेमा म्हणजे काय एखादा भूखंड आहे का? त्याचा भाव रोज वाढायला? उलट सिनेमा जेवढा जुना होईल तेवढा त्याचा भाव कमी होतो, उतरत जातो. पण हे काही निर्मात्यांच्या गळी कोण उतरवणार? या सगळ्यांचा तानाजींना राग येतो. ते तावातावाने बोलतात. मग इथं काही लोक त्यांच्या या सिनेमाविषयक आलेला ‘ओव्हररिऍक्शन’ नाव देतात आणि त्यांना चिडखोर, पॅनिक, भांडकुदळ, उद्धट अशा सदरात नेऊन बसवतात आणि ज्यांच्यापर्यंत पोहचवायचं आहे तिथंपर्यंत यथेच्छ पोहचवतात… मसाल्यासहीत दोन अडीच दशकांपूर्वी पंढरपूरच्या व्हीडीओपार्लरमध्ये असंख्य सिनेमे बघणारा माणूस, मायपुरी, फिल्मी दुनिया वगैरे वाचनात रमून जाणारा व्यक्ती ते सगळं पाहून वाचून हरखून जाऊ लागला. सिनेमाक्षेत्र त्यांच्या मनात घर करू लागलं. मन ‘मुंबईकड चलं’ असं म्हणू लागलं पुनःपुन्हा आवाज देऊ लागलं. पंढरपूर ते मुंबई अंतर मोठं पण तानाजी मनानं केव्हाच मुंबईत पोहोचले होते. शेवटी तुकाराम मोरे या जुन्या मित्राचा मुंबईतला पत्ता मिळाला. योगायोगाने तो मित्र फिल्मसिटीच्या जवळच्या आरे कॉलनीतच राहात होता… तो न्यूझीलंड होस्टेलमध्ये राहुल डेअरी टेलॉजीचा कोर्स करत होता… ठेपा ठरला, बॅग भरली, मुंबईला प्रयाण झालं. तुकाराम मोरे या मित्रानं ओळख काढून तानाजी यांचा चित्रीकरण दाखवलं… मायापुरीत वाचलेलं जग तानाजी जवळून पहात होते. ती लकाकी पाहून आपणही या क्षेत्रात आलंच पाहिजे. ही जिगीषा उचल खाऊ लागली.

तुकाराम मोरेंनी जशी चित्रपटनगरी दाखवली तसा मानही दिला आणि त्यांना माहीत असलेले खाचखळगे सांगितले हे अवघड आहे असं सांगितलं .मन खट्टू झालं. पुन्हा पंढरपूर गाठलं. पण व्हीडिओपार्लर वरचा ‘शहेनशहा’ हा सिनेमा खुणावू लागला. मायापुरीची पानं मनात फडफड करू लागली. मन थाऱयावर येईना. हिय्या केलं आणि पुन्हा मुंबईची वाट धरली. बरं इथं फार डॅमॅटीक काही नाही हं… घरची गरिबी, हलाखी काही नाही घरी बऱयापैकी शेती, सूखी कुटुंब होतं… ती निव्वळ त्या माध्यमाची भूक होती. ते चुंबक मुंबईकडं आकर्षित करत होतं…

ठाण मांडलं मुंबईत. सकारात्मक काही घडेना मग ज्युनिअर म्हणून क्राऊडमध्ये उभं राहायचं काम सुरू केलं. कुठूनतरी वाट मिळेल या आशेनं… पण कसलाच सिनेसंस्कार नसल्यानं त्यांना नुसतं उभं रहाणंही जमेना… इकडे पहा तिकडे पहा, कधी तर कॅमेरॅतच पाहा. रिटेक होऊ लागले. ती चलबिचल ते नवं माध्यम जाणून घेण्यासाठीची होती हे कुणाला सांगणार? असिस्टंट डायरेक्टर त्यांच्यावर चिडले. बाहेर काढलं. हे सगळं एक माणूस चिकित्सकपणे पहात होता.

धनसिंग यादव या व्यक्तीनं तानाजींच्या मनातली चुळबूळ हेरली. त्यांना क्षेत्राविषयी समजावून सांगितलं. का कुणास ठाऊक पहिल्या दिनापासून त्या दोघांमध्ये एक अनामिक बंध निर्माण झाला. विण दिवसेंदिवस घट्ट होत गेली. मित्र तानाजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडू लागले त्यांनी तानाजींच्या खानावळीची व्यवस्था केली. आणि ज्यामुळे तानाजींची विचार करण्याची पद्धत बदलली, त्यांना भान आलं अशी पुस्तकांशी त्यांची भेट घालून दिली. स्वतः दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात घेऊन गेले. नाव नोंदवलं आणि “पाहिजे ते वाच’’ असं सांगितलं… आणि तानाजींनी वाचनाचा सपाटा लावला.

त्यांना गोडी निर्माण झाली शाळेतल्या पुस्तकांच्या पलीकडं काहीही न वाचणारा तानाजी आता… श्री. ना. पेंडसे, रंगनाथ पठारे, नारायण घारप यांमध्ये रमू लागला. दिशा सापडायला फार मदत झाली. घनसिंग यादव स्वतः एक व्यावसायिक नट होते. त्यांनी तानाजींचा दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला. आणि मग एक अनाहू इसम वाटेत भेटला वाटाडय़ाच म्हणू या कांबळे ड्रायव्हर इतकंच नाव म्हणून आठवतंय ‘चला तुम्हाला एका माणसाची भेट घालून देतो’ म्हणाला आणि थेट तेव्हाचे मोठे निर्माते आणि इगल कंपनीचे मालक एफ.सी.मेहरा यांच्यासमोर उभं केलं… ‘हँण्ड-रायटिंग कैसा है’’ मेहरांचा प्रश्न.

“कुछ लिखके दिखाव…’’ तानाजीने दोन पानं लिहून उत्तर दिलं. मेहरा खुश झाले. तुम्हारा हॅण्डरायटिंग बहूतही अच्छा है… तानाजी त्या कंपनीत रुजू झाले… ‘यार गद्दार’, ‘चमत्कार’, ‘सबसे बडा खिलाडी’ इ. सिनेमांसाठी काम केलं आणि सगळ्या तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या. मोठमोठय़ा लोकांमधला वावर वाढला.. थोडं श्रीमंत वाटू लागलं. स्टुडिओमध्येच दिवसरात्र काम करू लागले. व्याप वाढला, रूची वाढली, रक्कमही येऊ लागली. ‘बाबा सावंत भेटले’. घरकूल सिरीयल माध्यमातून मराठीत प्रवेश झाला. बाबा सावंताची पूर्ण विश्वास दाखवला, दिलाही. हिंदीतून आलेले तानाजी मराठीत मुळं रूजवू लागेल. या सिरीयलची शेवटी संपूर्ण जबाबदारी त्यांना तांत्रिक अंगाचं भान असल्यामुळे त्यांच्यावर आली. त्यांना खूप शिकवूनही गेली. काही मोठी माणसं मार्गदर्शक म्हणून भेटली.

प्रा. कमलाकर सोनटक्केसरांसारखा आधारवड, आधारस्तंभ त्यांच्या वाटय़ाला आला. कमलाकरजी सोनटक्के म्हणजे मराठी नाटय़-सिने क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पान आहे. पर्व आहे. एक मोठा ऐवज आहे. नाटय़पर्वसाठी कमलाकरजींनी तानाजींवर जबाबदारी टाकली आणि तानाजींनीही ती समर्थपणे पार पाडली. सोनटक्के सरांमुळे अरविंद जगताप, मंगेश देसाई, मकरंद अनासपुरेसारखे मित्र मिळाले आणि मुंबईत जीव स्थिरावू लागला. रमलाही. जसं स्थैर्य यायला लागलं तसं स्वतःच सोडलेलं (या वेडापायी) शिक्षण दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केलं. घरच्यांनी लग्नाचं वय जाऊ नये म्हणून घाई केली. विवाहही झाला. पत्नीचंही डी.एड. केलं त्यांनाही नोकरीला लावलं. सृजनाची कास धरायला याहून उत्तम, सक्षम पार्श्वभूमी काय असावी?…

‘बस्ता’ हा सुनीलजी फडतरे निर्मित सिनेमा…या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाकडून त्यांना खुप अपेक्षा आहेत. सुनील फडतरेंबद्दल तानाजींच्या मनात नितांत श्रद्धा आहे. ती त्यांच्या बोलण्यात जाणवते. एक उत्तम निर्माता म्हणून आणि माणूस म्हणूनही ते त्यांना मानतात. ‘चुकीची माणसं भेटणारच. पण चुकीच्या माणसांना. मी सिरीयल बंद करीत पण तानाजी घाडगेला बदलणार नाही.’ असं म्हणणाऱया अलका कुबलताई तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला काळजी नाही. तेच उत्तर अशोक नारकरांचं कुरापतकारांना, काळजीची काय गरज?

कुरघोडय़ा होणारच…
पण तुमचंही नाव ‘तानाजी’ आहे.

[email protected]