क्यारनंतर आता महा चक्रीवादळ धडकणार, 1 ते 8 नोव्हेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीचा पाऊस अजूनही महाराष्ट्राची पाठ सोडत नसून पुन्हा पश्चिम अरबी समुद्रात महा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. महा चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाल्याने किनारपट्टी भागात अतिवृष्टी होणार आहे. हे चक्रीवादळ 1 ते 8 नोव्हेबर पर्यंत राहणार आहे. शुक्रवारी दुपारनंतर अलिबागसह रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मच्छीमारांना समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा मच्छीमार बोटी समुद्रकिनारी विसावल्या जाणार आहेत.

पश्चिमी अरबी समुद्रात महा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यात धडकणार असून याचा फटका या राज्यांच्या किनारपट्टीला बसणार आहे. चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आधीच शेतकऱ्याचे आणि मच्छीमारांचे नुकसान झाले असून पुन्हा पावसामुळे शेतकरी आणि मच्छीमार चिंतेत सापडला आहे.
चार दिवसापूर्वी क्य़ार चक्रीवादळाने थैमान घातले असताना पुन्हा महा हे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मत्स्य विभागाकडून मच्छीमाराना मासेमारीसाठी जाण्यास बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणेना, समुद्र किनारी आणि नदीकिनारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून अलिबागसह किनारपट्टी भागात पावसाने सुरुवात केली आहे.