
महाराष्ट्रात शिवसेनेची वाढती बार्गेनिंग ताकद व दिल्लीतील दबावामुळे भाजपचे नेते, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र बॅकफूटवर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आज दिवसभरात मुख्यमंत्र्यांच्या गोटात शांतता होती. खुद्द मुख्यमंत्रीही प्रसिद्धीमाध्यमांपासून लांब राहिले असून राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद न बोलावता फक्त ‘एएनआय’ या एकाच वृत्तसंस्थेला आमंत्रित करून ‘बाइट’ दिला. सरकार स्थापनेच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांकडून प्रश्नांचा भडिमार नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी टीव्ही चॅनेलला दिवसभर दूरच ठेवले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ‘अब की बार, 220 पार’ अशी घोषणा केली होती. भाजपने जोरदार वातावरणनिर्मिती केली होती पण विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्यक्ष निकाल हाती आल्यावर भाजपचे प्रत्यक्षात 105 आमदार निवडून आले. त्यानंतरही पंधरा अपक्ष व बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, मात्र भाजपला मिळालेल्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील नेतृत्वावर खूश नसल्याचे सांगण्यात येते. त्यातच मुख्यमंत्रीपद व फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
प्रसिद्धीमाध्यमांपासून लांब
एकीकडे दिल्लीतल्या नेतृत्वाचा दबाव तर दुसरीकडे प्रसिद्धीमाध्यमांकडून होणारा प्रश्नांचा भडिमार अशा दुहेरी कात्रीत मुख्यमंत्री सापडले आहेत. राज्यात ओल्या दुष्काळाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने राज्यपालांची भेट घेतली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ओल्या दुष्काळाच्या मागणीवरून आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांपासून चार हात दूरच राहणे पसंत केले आहे. ओल्या दुष्काळाच्या मुद्दय़ावरून भाजप सरकारवर दबाव वाढत आहे. या संदर्भातील उपाययोजनांची माहिती पत्रकार परिषदेत न देता केवळ ‘एएनआय’ या एकाच वृत्तसंस्थेला बोलावून ‘बाइट’ दिला. इतर चॅनेल्सकडून व पत्रकारांकडून प्रश्नांचा भडिमार होईल या भीतीमुळे राज्यातील सत्तसथापनेचा तिढा सुटेपर्यंत प्रसिद्धीमाध्यमांना लांबच ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
महाराष्ट्र भाजपच्या हातात ठेवा!
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. महायुतीला सत्तास्थापनेसाठी बहुमत आहे पण तरीही महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून, खास करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा दबाव असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य हातून जाऊ देऊ नका असा दिल्लीतल्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील दबाव वाढला आहे.
























































