
मध्य प्रदेशच्या शाळांमध्ये दुपारच्या जेवणात मुलांना अंडी देण्याच्या निर्णयाला भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने विरोध केला आहे. मुलांना मांसाहारी पदार्थ दिल्यास लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. मांसाहार करणारी मुले नरभक्षक बनतील, असे आक्षेपार्ह विधान गोपाळ भार्गव यांनी केले आहे.
महिला आणि बालकल्याणमंत्री इमरती देवी यांनी नोव्हेंबरपासून मुलांना दुपारच्या जेवणात अंडी देण्यास सुरुवात केली जाईल. त्यामुळे कुपोषणावर मात करता येईल, अशी घोषणा केली. कमलनाथ सरकारच्या या निर्णयावरून सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भार्गव यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार टीका केली आहे. कमलनाथ सरकार लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू शकत नाहीत. कोणालाही अंडी खाण्यासाठी सक्ती करू नये, असेही भार्गव म्हणाले.
हिंदुस्थानी संस्कृतीत मांसाहाराला बंदी!
भार्गव यांनी कमलनाथ सरकारविरोधात म्हणणे मांडताना हिंदुस्थानी संस्कृतीचा आधार घेतला. ‘एका कुपोषित सरकारकडून आणखी कोणती अपेक्षा केली जाऊ शकते. या सरकारने अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. जे खात नाहीत त्यांना जबरदस्तीने खायला लावले जाईल. अंडी खाऊनही मुले कुपोषित राहिल्यास भविष्यात त्यांना चिकन आणि बकऱयाचे मटणही दिले जाऊ शकते, मात्र हिंदुस्थानी संस्कृतीत मांसाहाराला बंदी आहे. त्यामुळे त्यांनी मांसाहार केला तर भविष्यात ते नरभक्षक बनतील,’ असे भार्गव म्हणाले.

























































