
सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे राहाता तालुक्यातील 30 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधीत झाले असून यातील सर्व पिकांचे पंचनामे करावे एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच बदलत्या हवामानामुळे तालुक्यातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून प्रत्येक गावात औषध फवारणी करून पिण्याच्या पाण्याच्या तपासण्या कराव्या. डेंग्यू, मलेरीया आदी साथीच्या रोगांचा बंदोबस्त करा अशा सूचना राधाकृष्ण विखे यांनी दिल्या आहेत.
राहाता तहसिल कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतातील सर्वच पिकांचे पुर्ण नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील शेतातील पिकाचे पंचनामे करावे, कुणीही वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी. सोयाबीन पिकाची कापणी केलेल्या मात्र पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करावे, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेला शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची अधिकाऱ्यांनी काळजी घेऊन प्रयत्न करावे असे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांनी साथीच्या आजाराने तालुक्यातील नागरिक हैराण झाल्याचे सांगताच विखे यांनी तालुका आरोग्य विभागाला फैलावर घेतले. तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून प्रत्येक गावातील ग्रामपंचायती व विविध संस्था यांनी सर्व गावे वाड्या वस्त्यांवर तातडीने औषध फवारणी व फॉगींग करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रांनी आपल्या गाव व परीसरातील सर्व पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासून द्यावे, या सर्वांवर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीला प्रांताधिकारी गोवींद शिंदे, जि. प. कार्यकारी अधिकारी पाटील, पं. स. सभापती हिराबाई कातोरो, गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, बाजार समिती सभापती बापूसाहेब आहेर, वाल्मीकराव गोर्डे, शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, तहसिलदार हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, पं. स. सदस्य ओमेश जपे, राजेंद्र पिपाडा, जि. प. सदस्यांसह नगरसेवक उपस्थित होते.
































































