
सध्याची मूल्यांकन पद्धत सदोष असून तिचा शालेय शिक्षणावर हानिकारक प्रभाव पडत आहे असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धत सोपी व्हावी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) मूल्यांकन पद्धतीत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत. तसे झाले तर एका शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याला दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल.
एनसीईआरटी 14 वर्षांनंतर ‘नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क’चा आढावा घेणार आहे. त्यानुसार नवा शैक्षणिक आराखडा तयार करून त्याआधारे मूल्यांकन पद्धतीचा फेरविचार केला जाणार आहे. सध्याचे शैक्षणिक धोरण 1986 मध्ये तयार करण्यात आले होते. त्यामध्ये 1992 साली बदल करण्यात आले तेव्हापासून ते एकच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणले जात आहे.
2022 सालापर्यंत मूल्यांकन पद्धतीत ‘नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क’च्या आधारे बदल करण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांनी एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा बोर्डाची परीक्षा देण्याच्या दृष्टीने एनसीईआरटीद्वारे मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
























































