जलाशयांच्या दुरुस्तीसाठी पालिका कामाला लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलैमध्ये मालाड पिंपरीपाडा जलाशयाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 हून अधिक जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या जलाशयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामध्ये वेरावली जलाशयाची मोडकळीस आलेली भिंत दुरुस्त करण्यात येणार असून रावळी जलाशय परिसराचा धोका टाळण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या बांधण्यात येणार आहे. शिवाय शहर विभागातील जलाशयांच्या जुनाट-गंजलेल्या जलवाहिन्याही बदलण्यात येणार आहेत.

या वर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत मालाड पिंपरीपाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संरक्षक भिंत परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने जलाशयांच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती तातडीने करण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये वेरावली मुंबई येथील जल विभागाअंतर्गत असलेल्या वेरावली जलाशयाची भिंत मोडकळीस आल्याचे समोर आल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

वेरावली उच्चस्तर जलाशय एक व दोनमधून येथून शहरातील के-पूर्व (अंधेरी) भागाला पाणीपुरवठा केला जातो, मात्र या जलाशयाची भिंत मोडकळीस आली आहे. शिवाय या ठिकाणी अतिक्रमणे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचे पोलीस विभागानेही कळवले आहे. या पार्श्वभूमीवर काँक्रीटची संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून अतिक्रमण रोखण्यासाठी काटेरी तारेचे कुंपणही घातले जाणार आहे. मे. ए. पी. आय. सिव्हिलकॉन प्रा. लि. कडून हे काम करून घेतले जाणार आहे. यासाठी पालिका 7 कोटी 25 लाख रुपये खर्च करणार आहे.

रावळी जलाशय परिसराचाही धोका टळणार
पालिकेच्या रावळी जलाशय टेकडीच्या परिसरात पावसाच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आल्याने झोपडपट्टीतील जनजीवन विस्कळीत होते. अतिवृष्टीत तर झोपडपट्टी भागात जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर रावळी उच्चस्तर टेकडीच्या सभोवती पर्जन्य जलवाहिन्या तयार करण्यात येणार आहेत. जेणेकरून झोपडपट्टीत शिरणारे पाणी थांबल्याने धोका टळणार आहे. या कामासाठी पालिका 1 कोटी 86 लाख रुपये खर्च करणार आहे.