
महावितरणने पुणे येथील औद्योगिक ग्राहकाला दिलेले वीज बिल चुकीचे असल्याचे सांगत विद्युत निरीक्षकांनी ते तडकाफडकी रद्द करत नव्याने बिल देण्याचे निर्देश दिले होते. त्याला महावितरणने विरोध दर्शवला होता. वीज बिलावरून या दोन्ही सरकारी यंत्रणा आमनेसामने आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) धाव घेतली असून त्यावर बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ) 2000 साली पुणे येथील पूना डाळ ऍण्ड बेसन मिलला वीज बिल पाठवले होते, मात्र सदर वीज बिल वीज वापरापेक्षा जादा असल्याचे सांगत त्यांनी विद्युत निरीक्षकांकडे दाद मागितली होती. त्यानुसार संबंधित विद्युत निरीक्षकांनी सप्टेंबर 2002 मध्ये सदर बिल रद्द करत नव्याने वीज बिल देण्याचे निर्देश महावितरणला दिले होते. त्याला नकार देत महावितरणने वीज आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर बुधवारी सुनावणी होत असून त्यामध्ये काय होणार याकडे महावितरणसह राज्याच्या विद्युत विभागाचे लागले आहे.

























































